रागाच्या भरात पत्नीवर प्राणघातक हल्ला करुन लष्करातील कर्मचाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2020 11:18 AM2020-05-24T11:18:58+5:302020-05-24T11:19:38+5:30
पोलीस निरीक्षक रवींद्र कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित मोरे हा सैन्यदलात स्वयंपाकी म्हणून काम करतो. एक महिन्यासाठी तो सुट्टीवर आलेला आहे.
पुणे : लष्करात काम करणार्या कर्मचार्याने किरकोळ कारणावरुन झालेल्या वादातून आपल्या पत्नीवर चाकूने प्राणघातक हल्ला करुन गंभीर जखमी केले. या घटनेनंतर त्याने स्वत:वरही वार करुन घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. दोघांवरही ससून रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.
ही गंभीर घटना येरवड्यातील आळंदी रस्त्यावरील शांती नगरमध्ये रविवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली. मोहिनी रोहित मोरे (वय २९) या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर ससून रूग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पती रोहित विजय मोरे (वय ३५) याला ताब्यात घेण्यात आले असून विश्रांतवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू केले आहे.
पोलीस निरीक्षक रवींद्र कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित मोरे हा सैन्यदलात स्वयंपाकी म्हणून काम करतो. एक महिन्यासाठी तो सुट्टीवर आलेला आहे. शांतीनगर येथील इलेव्हन स्टार मित्र मंडळ जवळ त्यांच्या राहत्या घरात रविवारी पहाटे किरकोळ कारणावरून रोहित व पत्नी मोहिनी यांच्यात वाद झाला होता. रागाच्या भरात रोहीत त्याने घरातील चाकूच्या साह्याने मोहिनी वर पोटात ९ वार केले. या घटनेनंतर त्याने स्वत: देखील वार करून घेतल्याचे समजते. गंभीर जखमी अवस्थेत मोहिनीला ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी विश्रांतवाडी पोलीस दाखल झाले असून पती रोहित मोरे याला देखील ताब्यात घेण्यात आलेले आहे. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू केले आहे. या घटनेमुळे शांतीनगर व परिसरात खळबळ उडाली आहे. अधिक तपास विश्रांतवाडी पोलिस करीत आहेत.