मुंबई - मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या कक्ष ५ चे पोलीस उपनिरीक्षक पाटील यांना त्यांच्या गुप्त बातमीदाराकडून गोवंडी येथील शिवाजी नगर परिसरात एक इसम बेकायदेशीर पिस्तूल विक्री करण्यासाठी येणार असल्याबाबत खात्रीलायक माहिती प्राप्त झाली होती. त्यानुसार सापळा रचून पोलिसांनी गोवंडी परिसरातील नागोरी चहाच्या दुकानाजवळून एका इसमाला अटक केली. त्याच्या अंगझडतीत एक देशी बनावटीचा कट्टा आणि १ काडतूस सापडले आहे. या आरोपीविरोधात हत्यार कायदा कलम ३, २५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अटक इसमाकडे आढळून आलेले पिस्तूल आणि काडतूस विक्रीसाठी आणल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत. ही कारवाई सहाय्यक पोलीस आयुक्त भोपळे, , प्रभारी पोलीस निरीक्षक अशोक खोत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पाटील, पोलीस उपनिरीक्षक बंडगर आणि सहाय्य्क फौजदार यादव, पोलीस हवालदार सावंत, जाधव, पोलीस नाईक शिरसाठ आणि नितीन जाधव, पोलीस शिपाई साळुंखे आणि मुलाणी यांनी केली आहे.