जबरी चोरी करणाऱ्या सराईत आरोपीला अटक, गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पथकाला यश
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2023 05:27 PM2023-10-03T17:27:08+5:302023-10-03T17:28:06+5:30
आरोपीकडून चोरी केलेली चेन व गुन्हा करण्यासाठी वापरलेली दुचाकी असा मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी प्रवीण बनगोसावी यांनी मंगळवारी दिली आहे.
मंगेश कराळे
नालासोपारा :- विरारमध्ये मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या वृद्ध इसमाच्या गळ्यातील सोन्याची चेन खेचून जबरी चोरी करणाऱ्या सराईत आरोपीला गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीकडून चोरी केलेली चेन व गुन्हा करण्यासाठी वापरलेली दुचाकी असा मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी प्रवीण बनगोसावी यांनी मंगळवारी दिली आहे.
विरारच्या भाऊ नगर, विवा कॉलेज जवळ, कुणाल बिल्डिंगमध्ये राहणारे श्रीनिवास नगीना शुक्ला (६७) हे २५ सप्टेंबरला सकाळी साडेसातच्या सुमारास विवा कॉलेज डी मार्ट रोडवरून पायी जात असताना दुचाकीवरून आलेल्या चोरट्याने त्यांच्या गळ्यातील ३० हजार रुपये किमतीचे तेरा ग्रॅम वजनाची सोनसाखळी हिसकावून पळून गेला होता. अर्नाळा पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला होता. पोलीस आयुक्तालयातील वसई विरारमध्ये गेल्या काही महिन्यांपासून जबरी चोरीचे प्रमाण वाढल्याने सदर घटनांची वरिष्ठांनी गांभीर्याने दखल घेऊन आरोपींचा शोध घेऊन पायबंध घालण्याच्या सूचना दिल्या होत्या. सदर गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेच्या युनिट तीनकडे दिला होता.
सदर गुन्हयाचा तांत्रिक विश्लेषण व मिळालेल्या माहितीनुसार आरोपी अनुज गंगाराम चौगुले (३३) याला २९ सप्टेंबरला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे. आरोपीने गुन्ह्यात वापरलेली दुचाकी आणि जबरी चोरी केलेली सोन्याची चेन असा १ लाख ९५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. पोलीस कोठडी दरम्यान आरोपीचा पूर्व इतिहास पडताळून पाहिल्यावर मुंबई, सातारा, पालघर, मध्यप्रदेश येथे सुपारी घेऊन खून करणे, दरोडा, जबरी चोरी, पोलीस कोठडीतून पळून जाणे, चोरी असे २५ पेक्षा जास्त व गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.
वरील कामगिरी पोलीस उपायुक्त (गुन्हे) अविनाश अंबुरे, सहाय्यक पोलीस आयुक्त अमोल मांडवे यांचे मार्गदर्शनाखाली युनिट तीनचे पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख, पोलीस उपनिरीक्षक अभिजित टेलर, उमेश भागवत, पोलीस हवालदार अशोक पाटील, मनोज चव्हाण, मुकेश तटकरे, सचिन घेरे, सागर बारवकर, मनोज सकपाळ, अश्विन पाटील, राकेश पवार, सुमित जाधव, सुनिल पाटील, युवराज वाघमोडे म.सु.ब. प्रविण वानखेडे, सागर सोनवणे, गणेश यादव तसेच सायबर सेलचे संतोष चव्हाण यांनी केली आहे.