पिंपरी : प्रतिबंधित क्षेत्र असलेल्या आनंदनगर झोपडपट्टीतील रहिवाशांनी सोमवारी दुपारी पोलिसांवर दगडफेक करून खुर्च्या, वाहन तसेच इतर नुकसान केले. याप्रकरणी ४८ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी मंगळवारी (दि. ९) पोलिसांकडून आरोपींची धरपकड सुरू करण्यात आली आहे. लक्ष्मण ठोकळ, संदीप वर्मा, विकास जाधव, रमेश साबळे, तेजस गोपरेड्डी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर देवनुल, विशाल मोरे, करण बोरुले, धन्या खंडागळे, बाळ्या, मुसा बाब्या, विशाल भोसले, मल्हारी कांबळे, धीरज म्हस्के, महादेव सरोदे, विमल गायकवाड, शिला कांबळे, कलावती सोनटक्के, रेश्मा कांबळे, रोहन आसोदे, राहुल चलवादी, रोहीत गोंदणे यांच्यासह इतर २० ते २५ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिंचवड स्टेशन येथील मालधक्का जवळ असलेल्या आनंदनगर झोपडपट्टीत कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने या भागाला प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे येथे पोलिसांचा बंदोबस्त आहे. सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास झोपडपट्टीतील काही रहिवासी एकत्र आले. बाहेरील सर्व गोष्टी सुरू केलेल्या आहेत. आम्हालाच का विनाकारण या ठिकाणी अडविण्यात येते. आम्हाला महापालिकेकडून कोणत्याही सुविधा योग्य प्रकारे पुरविण्यात येत नाहीत. तसेच आमच्या अडचणी विचारण्यास येथे कोणीही येत नाही. महापालिकेचे अधिकारी व राजकारणी यांनी आम्हाला दिलेले शब्द पाळलेले नाहीत. कोरोनामुळे कोणी मरत नाही, मग आम्हाला येथून बाहेर जाऊ द्यायला तुम्हाला काय अडचण आहे. गोळ्या दिल्या की, माणसे बरे होतायत. कोणाला काही होत नाही. आमच्यासोबत राजकारण केले जात आहे, असे म्हणून त्यांनी आरडाओरडा केला. जमावबंदी, संचारबंदी तसेच मनाई आदेश असतानाही त्याचे उल्लंघन केले. पोलिसांवर दगडफेक करून त्यांना जखमी केले. पोलिसांना बसण्यासाठी दिलेल्या खुर्च्या तोडल्या. पोलिसांच्या खासगी वाहनांचेही नुकसान केले. प्रतिबंधित क्षेत्र म्हणून हा भाग सील करण्यासाठी लावण्यात आलेले पत्रे उखडून टाकून शासकीय तसेच इतर मालमत्तेचे ३३ हजार रुपये किमतीचे नुकसान केले. तसेच सरकारी कामात अडथळा आणला. चिंचवडचे पोलीस उपनिरीक्षक नंदकुमार कदम तपास करीत आहेत.
पिंपरीतील उद्रेकानंतर आरोपींची धरपकड सुरु ; पोलिसांवर दगडफेक केल्याचे प्रकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2020 2:39 PM
कोरोनामुळे कोणी मरत नाही, मग आम्हाला येथून बाहेर जाऊ द्यायला तुम्हाला काय अडचण आहे...म्हणत नागरिकांनी केली होती दगडफेक ..
ठळक मुद्दे४८ जणांवर गुन्हा दाखल करून पाच आरोपींना केली अटक जमावबंदी, संचारबंदी आदेश असतानाही त्याचे केले उल्लंघन