लाेकमत न्यूज नेटवर्कमुंबई : क्रूझवरील कारवाईतून आर्यन खानला वाचविण्यासाठी मी किरण गोसावीसमवेत शाहरुख खानची मॅनेजर पूजा दादलानीशी परळ येथे भेटलो होतो, मात्र गोसावी हा खोटारडा असल्याने त्यांची सेटलमेंट होऊ शकली नाही, अशी कबुली सॅम डिसोझा याने दिली. डिसोझाने सोमवारी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ही कबुली दिली.
मंत्री नवाब मलिक आणि शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी या प्रकरणात सॅम डिसोझावर आरोप केले आहेत. तो या व्यवहारात महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे सांगितले. त्याबाबत डिसोझा म्हणाला की, माझे या प्रकरणाशी काही घेणे-देणे नाही. मला सुनील पाटील या व्यक्तीचा कॉल आला. तो राजकारणी व सनदी अधिकाऱ्यांच्या संपर्कात असतो. त्याने आपण अहमदाबादमध्ये असून त्याला क्रूझ ड्रग्ज पार्टीसंबंधी काहीतरी महत्त्वाची माहिती असून एनसीबीशी संपर्क साधायला सांगितले होते. त्यानंतर मला किरण गोसावीचा कॉल आल्याचा खुलासा डिसुझाने केला आहे.
मला या प्रकरणात पडायचे नव्हते, त्यामुळे मी काही अधिकाऱ्यांचा संपर्क त्याला दिला. नंतर त्यांच्यामध्ये यासंबंधी काही बोलणे झाले. त्यानंतर साडेआठच्या सुमारास या पार्टीसंबंधी काही अपडेट येणार असल्याचा कॉल आला. त्यावेळी आपण पहिल्यांदा किरण गोसावीला भेटलो. त्यानंतर मला सुनील पाटीलचा कॉल आला आणि यामध्ये कोण सेलिब्रेटीचा मुलगा आहे, ते चेक करायला सांगितले. त्यावेळी गोसावीने आर्यनचे नाव सांगून त्याच्याजवळ कोणतेही ड्रग्ज नसल्याने त्याला मदत करण्यास सांगितले. त्यावेळी यामध्ये मध्यस्थी करण्याचे मान्य केले. त्यानंतर परळजवळ पूजाला भेटलो, पण त्यावेळी त्यांच्यात काय बोलणे झाले, हे माहीत नाही. पण गोसावी हा फ्रॉड असल्याचे स्पष्ट झाल्याने पुढे काही व्यवहार झाला नाही.