कनिष्ठ न्यायालयांनी चारवेळा जामिन नाकारल्यानंतर आता शाहरुख खानचा मुलागा आर्यन खानच्या (Aryan Khan) जामिनासाठी उच्च न्यायालयामध्ये सुनावणी सुरु आहे. एकीकडे एनसीबीने साक्षीदार प्रभाकरचे आरोप आणि आर्यन खानच्या जामिनाचा काहीही संबंध नसल्याचा दावा न्यायालयात केलेला आहे, तर दुसरीकडे शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानीचे (Pooja Dadlani) नाव घेत जामिन देण्यास विरोध केला आहे. (Mumbai Cruise Drugs Case)
आर्यन खानला सोडविण्यासाठी माजी अॅटॉर्नी जनरल मुकुल रोहतगी यांची मोठी टीम कार्यरत आहे. काही वेळापूर्वीच सुनावणी सुरु झाली आहे. एनसीबीकडून आर्यन खानला जामिन का मिळू नये, यावर बाजू मांडली जात आहे. यावेळी एनसीबीने पूजा ददलानीचे नाव घेतले आहे. प्रभाकरच्या अॅफिडेव्हिटमुळे शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानीचे नाव जोडले गेले आहे. यामुळे पूजा ददलानीने तपासावेळी साक्षीदारांना प्रभावित केले आहे. साक्षीदारांना अशाप्रकारे फोडले जात असल्याने आर्यन खानचा जामिन रद्द करण्यासाठी एक महत्वाची बाब म्हणून पहावे, असे एनसीबीच्या वकिलांनी म्हटले आहे.
आर्यन खानच्या वकिलांनी न्यायालयात दोन पानी अॅफिडेव्हिट सादर केले असून त्यामध्ये त्यांनी आर्यन आणि प्रभाकर यांचा काहीही संबंध नाहीय. सध्या जे काही सोशल मीडियावर आहे त्याच्याशी आमचा काही संबंध नाहीय असे म्हटले आहे.
त्या आधी आर्यन खानच्या जामिनावर एनसीबीने मुंबई उच्च न्यायालयाचाच रिया चक्रवर्तीविरोधातील आदेश निदर्शनास आणून दिला आहे. एनडीपीएस नियमांनुसार दाखल झालेले सर्व गुन्हे हे जामिनास पात्र नाहीत, असे न्यायालयाने तेव्हा म्हटले होते, असे एनसीबीने म्हटले आहे.