कल्याण - वीजचोरी पकडल्याच्या रागातून महावितरणच्या सहायक अभियंता व कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केल्याची घटना उल्हासनगर येथील सेक्शन तिसमध्ये बुधवारी दुपारी घडली. मारहाण करणाऱ्या पिता-पुत्राविरुद्ध विठ्ठलनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला अटक झाली आहे. दरम्यान गुरुवारी (०५ मार्च) पोलीस संरक्षणात विजचोरीच्या उर्वरित पंचनाम्याचे काम पूर्ण करून पुढील कार्यवाही सुरु करण्यात आली.
अमरलाल सुंदरदास बजाज व बंटी अमरदास बजाज (रा. बरॅक क्र. १४९३, रुम क्र. ०४, सेक्शन ३०, उल्हासनगर-०४) अशी हल्लेखोरांची नावे आहेत. यातील बंटी बजाज याला अटक करण्यात आली आहे. नागराणी शाखा कार्यालयाचे सहायक अभियंता सालोमन तलारी हे त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्यासंह मीटर तपासणी करीत असताना आरोपींच्या घरात मीटर बायपास करून टॅपींगच्या माध्यमातून वीजचोरी सुरू असल्याचे आढळून आले. तलारी यांनी वीजचोरीचा प्रकार आरोपींच्या निदर्शनास आणून कार्यवाहीला सुरुवात केली असता आरोपी पिता-पुत्राने तलारी व कर्मचारी दिलीप राजु भिल यांना बेदम मारहाण करीत कार्यवाहीची कागदपत्र हिसकावून घेत धमकावले. तलारी यांच्या फिर्यादीवरुन आरोपींविरूद्ध सरकारी कामात अडथळा, सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण यासह भारतीय दंड संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर वीजचोरीच्या पंचनाम्याची अर्धवट असलेली कार्यवाही गुरुवारी पोलिस संरक्षणात पुर्ण करण्यात आली असून वीजचोरीचे बिल व दंड भरण्याबाबत नोटिस बजावण्यात येणार आहे. बंटी बजाज या आरोपीने यापूर्वी त्याच्या श्रीकृष्ण ज्युस बार या दुकानासाठी डमी मीटरचा वापर करून वीजचोरी केल्याचे समोर आले आहे. यासंदर्भात तलारी यांच्या फिर्यादीवरून बंटी बजाज विरूद्ध ८० हजार रुपयांच्या वीजचोरी प्रकरणी विठ्ठलवाडी पोलिस ठाण्यातच २४ फेब्रुवारी २०२० रोजी गुन्हा दाखल आल्याची माहिती महावितरणने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिल्याचे जनसंपर्क अधिकारी दूधभाते यांनी दिली.
कर्तव्यावर असणाऱ्या वीज कर्मचाऱ्यांना मारहाण, त्यांच्या कामात अडथळा आणणे तसेच वीजचोरी हे गंभीर स्वरुपाचे व अजामीनपात्र गुन्हे असून या गुन्हात कडक शिक्षेची तरतुद आहे. अशा विजचोर व हल्लेखोरांविरुद्ध कडक कारवाईसाठी महावितरण आग्रही असून कडक शिक्षेसाठी सातत्यपुर्ण पाठपुरावा करण्यात येत आहे. वीजचोरांविरूद्धची मोहिम आणखी तीव्र करण्यात येणार असून कारवाई टाळण्यासाठी ग्राहकांनी विजेचा चोरटा व अनधिकृत वापर यापासून कटाक्षाने दूर रहावे, असे आवाहन कल्याण परिमंडलाचे मुख्य अभियंता दिनेश अग्रवाल यांनी परिमंडळातील ग्राहकांना केले आहे.