कल्याण - येथील पश्चिमेकडील रेल्वे स्थानक परिसरातील एटीएम पासवर्डच्या माध्यमातून उघडून आतील 49 लाख 2 हजार 500 रूपयांची रोकड चोरटयांनी लंपास केल्याची घटना शुक्रवारी घडली होती. याप्रकरणात महात्मा फुले चौक पोलिसांनी शिताफीने तपास करून तिघांना अटक केली आहे. यात रायटर सेफगार्ड प्रा.लि कंपनीतील एका एटीएम ऑपरेटरसह त्याच्या दोन साथीदारांचा समावेश आहे.रेल्वे स्थानकाजवळील बी.पी.जोशी कंपाउंड येथील आभा बिल्डींगमधील गाळा नं 1 मध्ये हे एटीएम सेंटर आहे. ज्यावेळी हा चोरीचा प्रकार उघडकीस आला त्यावेळी घटनास्थळी पोलिसांना कोणतीही तोडफोड दिसून आली नाही. एटीएम सेंटरचा पासवर्ड वापरून रोकड चोरून नेल्याचे समोर आले होते. त्यामुळे चोरीचे काम एटीएम माहीतगाराचे असावे असा अंदाज प्राथमिक तपासात पोलिसांनी लावला होता.चौकशीत रायटर सेफगार्ड कंपनीचे कर्मचारी एटीएम मशिन ऑपरेटर किरण पंडीत आणि प्रणव मोरे यांच्याकडे संबंधित एटीएम मशीनचे पासवर्ड होते. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत पासवर्ड त्यांच्याच कंपनीत काम करणारे चेतन हिराळकर आणि अमर माळी यांना दिल्याचे त्यांनी सांगितले. यावरून पोलिसांनी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून पुढील तपासाला सुरूवात केली. दरम्यान पोलिसांच्या तपासात एटीएम ऑपरेटर किरण पंडीत हाच चोरी मागचा मुख्य सुत्रधार असल्याचे निष्पन्न झाले. चौकशीअंती त्याच्यासह त्याचे साथीदार जयदीप पवार आणि जुगलकिशोर मिश्रा अशा तिघांना या गुन्हयात अटक करण्यात आली आहे. हे तिघेही कल्याणमधील रहिवाशी आहेत. त्यांना 12 जूनर्पयत पोलिस कोठडी असून त्यांच्याकडून 39 लाख 85 हजाराची रोकड, दोन दुचाकी आणि चार मोबाईल असा 42 हजार 79 हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
एटीएम रोकड चोरी प्रकरण, ऑपरेटरसह साथीदारांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2020 9:18 PM