आता बँक खात्यातून पैसे चोरी झाल्यास एक्सपर्ट लावणार छडा अन् परत करणार रक्कम!
By ravalnath.patil | Published: October 29, 2020 04:24 PM2020-10-29T16:24:51+5:302020-10-29T16:31:54+5:30
Cyber Fraud : आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणात लोकांना मदत करण्यासाठी आणि त्यांचे पैसे परत मिळवण्यासाठी सायबर फॉरेन्सिक एक्सपर्टची टीम तयार करण्यात आली आहे.
नवी दिल्ली : एटीएम किंवा डेबिट कार्ड आपल्या खिशात ठेवलेले असते. मात्र, आपल्या बँक खात्यातून पैसे काढले जातात. एवढेच नाही तर सायबर गुन्हेगार (सायबर फ्रॉड) दुसर्याच्या हातात गेलेल्या आपल्या क्रेडिट कार्डवरून खरेदी करतात. मात्र, ही फसवणूक ज्यावेळी आपल्या मोबाइलवर या ट्रान्जक्शनचा(Mobile Transations) मेसेज येतो. त्यावेळी कळते. परंतु आता अशा प्रकारच्या सायबर आर्थिक फसवणुकीत गेलेली रक्कम परत मिळण्यासाठी सरकारने तज्ज्ञांची टीम तयार केली आहे. या टीमला सायबर फॉरेन्सिक एक्सपर्ट म्हटले जाणार आहे. टीमच्या मदतीसाठी देशात लॅबोरटरी तयार करण्याचे कामही सुरू आहे.
12615 जणांच्या या टीममध्ये तीन प्रकारचे एक्सपर्ट असतील
संसदीय समितीसमोर गृह मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणात लोकांना मदत करण्यासाठी आणि त्यांचे पैसे परत मिळवण्यासाठी सायबर फॉरेन्सिक एक्सपर्टची टीम तयार करण्यात आली आहे. टीममध्ये 12615 लोक आहेत. यामध्ये पोलीस, सरकारी वकील आणि न्यायालयीन सेवेशी संबंधित लोकांचा समावेश आहे. हे सर्व देशाच्या विविध भागातील आहेत. हे खासकरून सायबर आर्थिक फसवणुकीतील पीडिताला मदत करतील. तसेच, महिला आणि मुलांवर होणाऱ्या सायबर क्राइममध्ये सुद्धा पीडिताला मदत करतील.
तक्रार करण्यासाठी पोर्टल तयार
संसदीय समितीसमोर गृह मंत्रालयाच्या अधिका-यांनीही सांगितले की, आता सायबर आर्थिक फसवणूक झालेल्या व्यक्तीला तक्रार करण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये जाण्याची गरज नाही. पीडित व्यक्ती घरी बसून सायबर क्राइम नावाच्या पोर्टलवर तक्रार देऊ शकते. एकदा तक्रार दाखल झाल्यानंतर संबंधित तपास अधिकारी पीडितेशी स्वतः संपर्क साधतील. तसेच महिला व मुलांवरील सायबर क्राईमच्या तक्रारीही या पोर्टलवर करता येतील आणि अशा विशेष प्रकरणात तक्रारदाराची ओळख देखील गोपनीय ठेवली जाईल.