महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. ७ सप्टेंबरपर्यंत त्यांच्यावर कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे कोर्टाने आदेश दिले आहेत. दरम्यान गजानन काळे यांच्या पत्नीने विवाहबाह्य संबंध, कौटुंबिक हिंसाचार आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप तक्रारीत केला आहे. सध्या नेरूळ पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात कौटुबिंक हिंसाचार आणि अट्रॉसिटीची तक्रार नोंदवण्यात आली आहे.
पत्नीने पोलिसात धाव घेतल्यापासून गजानन काळे फरार आहेत. काळे यांच्या पत्नीने या प्रकरणात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांची भेट घेऊन सर्व घडलेला प्रकार त्यांना सांगितला आहे. गेल्या काही वर्षांपासून गजानन काळे मारहाण करत होते अशी तक्रार त्यांच्या पत्नीने केली आहे. तसेच त्यांचे अनेक स्त्रियांशी विवाहबाह्य संबंध असल्याचा खळबळजनक आरोप करण्यात आला आहे. गजानन काळे आणि संजीवनी काळे हे २००८ साली विवाहबद्ध झाले.
मात्र, गुन्हा दाखल झाल्यापासून गजानन काळे हे फरार आहेत. नवी मुंबई पोलिसांची १० पथकं त्यांचा शोध घेत आहेत. गजानन काळेंवर गुन्हा दाखल असल्याने आता पोलिसांना देखील त्यांचा शोध घेण्याचं आव्हान आहे. काळेंचा फोन स्वीच ऑफ आहे. मात्र, गजानन काळे यांच्यावर पत्नीने गंभीर आरोप केल्यानंतर भाजपासह महाविकास आघाडीमधील महिला चांगल्याच आक्रमक पाहायला मिळाले होते. तक्रार दाखल करुन अनेक दिवस उलटून देखील अटक झालेली नसल्याने संताप व्यक्त केला जात होता. भाजपाच्या चित्रा वाघ यांनी आपण संजीवनी काळे यांंच्या मागे उभ्या असल्याचं म्हटलं आहे.