VIDEO : एटीएसची मोठी कारवाई; नऊ जण ताब्यात, आयसिसशी संबंध असल्याचा संशय
By पूनम अपराज | Published: January 22, 2019 05:24 PM2019-01-22T17:24:17+5:302019-01-22T17:25:53+5:30
अखेर आज त्यांना एटीएसने ताब्यात घेऊन मोठी कारवाई केली आहे.
मुंबई - महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) आज कारवाई करत मुंब्र्यातील कौसा, अमृतनगर येथून चार जणांना तर औरंगाबादेतून पाच जणांना ताब्यात घेतले आहे. २६ जानेवारीला साजरा होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर ही अतिशय महत्वाची कारवाई असल्याचे म्हटले जात आहे. ताब्यात घेतलेल्या सर्वांचे आयसिसची संबंध असल्याच्या संशयावरून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. हे सर्वजण अनेक दिवसांपासून एटीएसच्या रडारवर होते. अखेर आज त्यांना एटीएसने ताब्यात घेऊन मोठी कारवाई केली आहे. एटीएसचे प्रमुख अतुलचंद्र कुलकर्णी यांनी लोकमतशी बोलताना सांगितले की, आम्ही काही संशयित लोकांना ताब्यात घेतलं असून त्यांच्याकडे चौकशी सुरु आहे. अदयाप काही निष्कर्ष काढू शकत नाही.
२६ जानेवारीच्या पार्श्वभूमीवर एटीएसची मोठी कारवाई केली आहे. मुंबईत अथवा महाराष्ट्रात काही घातपात होण्याची शक्यता एटीएसला मिळाली होती. त्याअनुषंगाने ही एटीएसने कारवाई केली आहे. ताब्यात घेतलेले नऊही जण पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेशी संबंधित असून राष्ट्रीय गुप्तचर यंत्रणेला (एनआयए) मिळालेल्या माहितीनुसार ही संलग्न कारवाई करण्यात आली आहे. मुंब्र्यातून ताब्यात घेतलेल्या एका तरुणाने सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट देखील केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
गेल्याच महिन्यात एनआयएने दिल्ली आणि उत्तर प्रदेशमध्ये १६ ठिकाणी छापे घातले होते. दिल्लीच्या जाफराबाद आणि उत्तर प्रदेशच्या अमरोहामध्ये आयसिस संघटनेशी संपर्कात असलेल्या ठिकाणांवर ही मोठी कारवाई करण्यात आली होती. या सर्च ऑपरेशनमध्ये एनआयएसोबतच उत्तर प्रदेश दहशतवादविरोधी संघटनांचादेखील सहभाग होता. औरंगाबाद आणि मुंबई एटीएसने औरंगाबादमध्ये पहाटे साडेचारपासून कारवाई सुरु होती अशीही माहिती मिळाली आहे. कैसर कॉलनीत त्यांनी जाहेद नावाच्या माणसाला शोधण्यासाठी छापा टाकण्यात आला. 9 जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. या सगळ्यांची चौकशी झाल्यावरच आरोपींची माहिती देणार आहेत.
एटीएसची कारवाई; आयसिसशी संबंध असल्याने मुंब्र्यातून चार तर औरंगाबादेतून पाच जण ताब्यात
— Lokmat Media Pvt Ltd (@MiLOKMAT) January 22, 2019