जितेंद्र सावंत यांच्यावर हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2020 12:37 AM2020-08-01T00:37:26+5:302020-08-01T00:37:30+5:30
३४ जणांविरोधात गुन्हा दाखल : राजकीय वैमनस्यातून घडली घटना?
लोकमत न्यूज नेटवर्क
दासगाव : रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य जितेंद्र सावंत यांच्यावर गुुुरुवारी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास महाड तालुुक्यातील त्यांच्याच कोकरे गावातील एका गटाने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यामध्ये सावंत जखमी झाले असून, हल्लेखोरांनी त्यांच्या गाडीचीही तोडफोड केली आहे. या प्रकरणी सावंत यांनी हल्लेखोरांच्या विरोधात तक्रार केली आहे. महाड तालुका पोलिसांनी कोकरे गावांतील ३४ जणांच्या विरोधांत गुन्हा दाखल केला आहे.
३० जुलै रोजी तालुक्यातील दाभोळ खलाटीवाडीमध्ये तंटामुक्ती अध्यक्ष आबाजी रामा नाडकर यांनी ग्रामस्थांच्या सभेचे आयोजन केले होते. या सभेचे आमंत्रण जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र सावंत यांनाही देण्यात आले होते. गावातील काही किरकोळ समस्या आणि वादावर या सभेमध्ये सविस्तर चर्चा करण्यात येऊन वाद मिटविले. सभेचे कामकाज रात्री १० वाजण्याच्या सुमाराला संपल्यानंतर सावंत नातेवाईक विजय सावंत, स्वराज सावंत, निर्जता नितेश चिवीलकर यांच्याबरोबर गाडीतून घरी जात होते. थोडे अंतर गेल्यानंतर त्यांच्या गाडीजवळ तीस ते चाळीस जणांनी अचानक गराडा घातला आणि शिवीगाळ करत धक्कबुुुकी केली. यात सावंत आणि नातेवाईक जखमी झाले.
गाडीचेही केले नुकसान
हल्लेखोरांनी गाडीचेही नुकसान केले, सर्व हल्लेखोर कोकरे गावातील असून, राजकीय द्वेषातून प्राणघातक हल्ला करण्यात आला असल्याचे सावंत यांनी सांगितले. या प्रकरणी त्यांनी महाड तालुका पोलीस ठाण्यात ३४ जणांच्या विरोधात तक्रार दाखल केली .