ठाण्यात बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपीचा कारागृहात आत्महत्येचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2019 10:02 PM2019-10-14T22:02:38+5:302019-10-14T22:03:07+5:30

ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील बराक क्रमांक सहा येथून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना सोमवारी सकाळी घडली

Attempt to commit suicide in rape crime in Thane | ठाण्यात बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपीचा कारागृहात आत्महत्येचा प्रयत्न

ठाण्यात बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपीचा कारागृहात आत्महत्येचा प्रयत्न

Next

ठाणे: लैंगिक अत्याचार आणि अमली पदार्थाच्या गुन्ह्यात ठाणे कारागृहामध्ये शिक्षा भोगत असलेल्या दीपक गुप्ता (28) या आरोपीने ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील बराक क्रमांक सहा येथून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. याप्रकरणी ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, त्याला मुंबईतील सर जे. जे. रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 

कारागृहातील बराकीमध्ये जागा अपुरी असल्यामुळे झोपण्यासाठी जागा अपुरी पडते, अशी तक्रार करीत आपल्याला अन्य ठिकाणच्या बराकीमध्ये जागा मिळावी, अशी मागणी दीपक या बंदीने कारागृह प्रशासनाकडे केली होती. मात्र, कारागृहात क्षमतेपेक्षा जास्त कैदी असल्यामुळे जागा होताच लवकरच अन्यत्र जागा दिली जाईल, अशी या बंदीची कारागृहातील अधिकाऱ्यांंनी समजूत काढली होती. प्रत्यक्षात त्याला अन्यत्र जागा मात्र दिली नव्हती. यातूनच संतप्त झालेल्या या बंदीने 14 ऑक्टोंबर रोजी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास बराक क्रमांक सहावरून उडी मारली.

गंभीर जखमी अवस्थेत त्याला सुरुवातीला ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, पाठीवरील मणक्याला आणि माकड हाडाला जबर मार लागल्यामुळे त्याची प्रकृती चिंताजनक होती. त्यामुळे पुढील उपचारासाठी त्याला मुंबईतील सर जे. जे. रुग्णालयात हलविण्यात आल्याचे ठाणे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी सांगितले. ठाणे ग्रामीणमधील नयानगर पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध लैंगिक अत्याचारासह गुटखा बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला आहे. याच गुन्ह्यात त्याला अटक झाल्यानंतर न्यायालयीन कोठडीत असल्यामुळे त्याला ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले होते.

Web Title: Attempt to commit suicide in rape crime in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.