बारामती : इंदापुर तालुक्यातील भवानीनगर येथे सराफी दुकानावर गुरूवारी (दि.२५ ) मध्यरात्री दरोडा टाकण्यात आला.मात्र, पोलिसांच्या तत्परतेमुळे दुकानावर दरोडयाचा प्रयत्न फसला.अवघे काही तोळे सोने लंपास करण्यात दरोडेखोरांना यश आले. दरोडा टाकला असतानाच पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यामुळे दरोडेखोरांनी फरार होण्याचा प्रयत्न केला.परंतु,पोलिसांनी पाठलाग करून तिघा जणांना पकडले. याप्रकरणी पकडण्यात आलेल्या आरोपींचे नावे शौकत शेख, शमीम शेख ,अजिजुर शेख (तिघेही रा.झारखंड )असे आहेत.या दरोड्याच्या मुख्य सूत्रधार मगनू शेख, दिलू शेख (रा.पश्चिम बंगाल) दोघे असल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच पाच जण आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या दरोडेखोरानी दहा ते बारा तोळे सोने लंपास करण्यात इतर साथीदार यशस्वी झाले. गुरूवारी मध्यरात्री एक ते तीनच्या सुमारास हा प्रकार घडला. घटनेनंतर काहीवेळातच उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तेथील सीसी फुटेजच्या माध्यमातून घटनाक्रम जाणुन घेण्याचा प्रयत्न केला. या बाबत पत्रकारांशी बोलताना शिरगांवकर म्हणाले की या घटनेत आठ जणांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. हे सर्व जण पिकअप गाडी घेऊन दरोडा टाकण्यासाठी आले होते. दुकानाच्या मागील बाजूचे दोन शटर गॅस कटरने कापून दरोडेखोरानी दुकानात प्रवेश केला. यावेळी दुकानांतील शोकेसमध्ये असणारे आठ किलो सहाशे छप्पन ग्रॅम चांदीचे सुमारे तीन लाख पंचेचाळीस हजार किंमतीचे दागिने घेवून जात असताना पोलिसांना मिळून आले आहेत. मात्र, तिजोरीतील दहा ते बारा तोळे सोने लंपास करण्यात आल्याचा अंदाज आहे.
इंदापूर तालुक्यात पोलिसांच्या सतर्कतेमुळे दरोड्याचा प्रयत्न फसला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2018 5:25 PM
इंदापुर तालुक्यातील भवानीनगर येथे सराफी दुकानावर गुरूवारी (दि.२५ ) मध्यरात्री दरोडा टाकण्यात आला.मात्र, पोलिसांच्या तत्परतेमुळे दुकानावर दरोडयाचा प्रयत्न फसला.
ठळक मुद्दे याप्रकरणी पाठलाग करून तीन जण ताब्यात आठ किलो सहाशे छप्पन ग्रॅम चांदीचे सुमारे तीन लाख पंचेचाळीस हजार किंमतीचे दागिने जप्त