अमृता फडणवीस यांच्याकडून खंडणी वसूल करण्याचा प्रयत्न; अनिल जयसिंघानीवर आरोपपत्र दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2023 11:58 AM2023-05-20T11:58:13+5:302023-05-20T12:18:23+5:30
या आरोपपत्रात १३ साक्षीदारांच्या साक्ष जोडल्या आहेत. अमृता फडणवीस यांनी केलेल्या तक्रारीनुसार, अनिल जयसिंघानीची मुलगी अनिक्षा कपडे व दागिने डिझायनर आहे.
मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याकडून खंडणी वसूल करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपी असलेला क्रिकेट बुकी अनिल जयसिंघानी, त्याची मुलगी अनिक्षा जयसिंघानी व चुलत भाऊ यांच्यावर मुंबई पोलिसांनी ७३३ पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे.
या आरोपपत्रात १३ साक्षीदारांच्या साक्ष जोडल्या आहेत. अमृता फडणवीस यांनी केलेल्या तक्रारीनुसार, अनिल जयसिंघानीची मुलगी अनिक्षा कपडे व दागिने डिझायनर आहे. व्यवसायानिमित्ताने अनिक्षाने अमृता यांच्याशी जवळीक साधली. त्यानंतर तिने तिच्या वडिलांवरील सर्व प्रकरणे रद्द करण्याची विनंती अमृता यांना केली. त्याबदल्यात अमृता यांना एक कोटी रुपये देऊ केले. या मागणीनंतर अमृता यांनी तिचा नंबर ब्लॉक केला. तरीही त्यांना वेगवेगळे व्हिडीओ, मेसेज जयसिंघानीकडून येत राहिले. गुन्हा दाखल केल्यानंतर दोन दिवसांनी अनिक्षाने अमृता यांना मेसेजद्वारे धमकी देत त्यांचे फोटो व्हायरल न करण्यासाठी दहा कोटी रुपयांची खंडणी मागितली. अनिक्षाने पाठवलेल्या एका व्हिडीओत तिच्या हातात एक बॅग आहे. त्यात ती पैसे भरताना दिसते आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये तीच बॅग अमृता यांच्या घरी दिसते. त्यावर एफएसएल रिपोर्टने स्पष्टीकरण देताना म्हटले की, पहिल्या व्हिडीओत बॅग भरलेली आहे, तर दुसऱ्या व्हिडीओमध्ये बॅग हलकी असल्याचे दिसते.
‘ती’ची साक्ष ग्राह्य
अनिल जयसिंघानी, अनिक्षा जयसिंघानी आणि त्यांचा नातेवाईक निर्मल जयसिंघानी यांची नावे आरोपपत्रात आरोपी म्हणून आहेत. २० फेब्रुवारी रोजी मलबार हिल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या सर्वांना मार्चमध्ये अटक करण्यात आली होती. आरोपपत्रात सीआरपीसी कलम १६४ अंतर्गत दिलेल्या विधानांचा समावेश आहे. तसेच अनिक्षाच्या मैत्रिणीने दंडाधिकारींसमोर दिलेल्या जबाबाचाही समावेश आहे. खटल्यादरम्यान तिची साक्ष ग्राह्य धरण्यात येईल.