पनवेल - पनवेल शहरातील मार्केट यार्ड परिसरातील समीर हॉटेल व लॉजिंग आणि बोर्डींगमध्ये दोन दिवसासाठी राहण्यास आलेल्या एका दाम्पत्याने अज्ञात कारणावरुन किटकनाशकाच्या सहाय्याने आपले जीवन संपविण्याचा प्रयत्न केला. यात त्यांची २ वर्षाच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
या दोघांवर मुंबई येथील जे.जे.रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वाहशीम के.अ.रा.पुंजी, चिराटावुन्न व त्यांच्याबरोबर असलेली पत्नी लिजी कुरियन व त्यांची २ वर्षाची मुलगी हे दोन दिवसासाठी पनवेल येथील समीर लॉजिंग व बोर्डींग येथे राहण्यास आले होते. ते राहत असलेल्या १०१ रूमचा दरवाजा ठोठावला तरी आतून काही आवाज येत नसल्याने त्याने याबाबतची माहिती मॅनेजरला दिली व त्यानंतर लॉजचालकांनी त्यांच्याकडील चावीने दरवाजा उघडून प्रवेश केला. त्यावेळी हे दाम्पत्य व त्यांची २ वर्षीय चिमुकली बेशुद्ध अवस्थेत बेडवर पडल्याचे रुममध्ये आढळून आले व त्यावेळी किटकनाशकाचा उग्र वास रुममध्ये येत होता. मॅनेजरने तात्काळ पनवेल शहर पोलिसांशी संपर्क साधून या घटनेची माहिती दिली.
तातडीने पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय तायडे व त्यांचे पथक घटनास्थळी रवाना झाले. त्या अनुषंगाने यांच्याबाबत माहिती मिळविण्याच्या हेतूने ते राहत असलेल्या रूमची पोलिसांनी झडती घेतली असता झडतीत मिळून आलेल्या ओळखपत्रावरून त्यांची नावे व संपूर्ण पत्ता मिळाला त्यानुसार संतापूर पोलीस ठाणे जि. युडूडूक्की, राज्य केरळ येथील पोलीस ठाण्याशी पनवेल पोलिसांनी फोनद्वारे संपर्क केला असता नमूद दोघांनी सादर स्त्रीचे पती रिजोश याचा खून करून पळून मुंबईला गेले असल्याची माहिती मिळाली व संतापूर पोलीस स्टेशनचे पोलीस मुंबई येथे या तपासकामी आलेले समजल्यानंतर संतापूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विनोद कुमार व जॉनी थॉमस यांना बोलावून अधिक माहिती घेतली असता बेशुद्ध असलेली स्त्री व पुरुष यांनी स्त्रीचे पती रिजोश याचा ३१/१०/२०१९ रोजी खून केला व त्यानंतर तो मिसिंग झाल्याबाबत संतापूर पोलीस ठाणे येथे मिसिंग तक्रार दाखल होती.
संतापूर पोलीस ठाणे राज्य केरळ पोलिसांकडून तिचे पतीबाबत वारंवार सखोल तपस केला जात असल्याने नमूद स्त्री लिजी कुरियन वय २९ हि दिनांक ५/११/२०१९ रोजी पासून मिसिंग असल्याची तक्रार तिच्या भावाने संतापूर पोलीस ठाणे येथे दिली होती. संतापूर पोलीस ठाण्याच्या पोलिसांकडे अधिक तपास केला असता बेशुद्ध इसम वाहसीम अब्दुल कादिर वय ३५ वर्षे हा म्हसरूम हार्ट फार्म संतापूर येथे मॅनेजर म्हणून काम करीत होता व लिजी कुरियन वय २९ हि याठिकाणी ऑफिसमध्ये नोकरी करीत होती त्यांच्यातील प्रेम संबंधावरून त्यांनी तिचे पती रिजोश याचा खून केल्याने त्यांच्या विरोधात संतापूर पोलीस ठाणे येथे खुनाचा गुन्हा दाखल होता.
या गुन्ह्यात बेशुद्ध इसम वाशीम अब्दुल कादिर यांच्या भावास अटक केलेली असल्याने व त्याचा गुन्ह्यात सहभाग असल्याचे पोलिसांना समजले असल्याने त्यांनी विष प्राशन केले असावे. पनवेल शहर पोलिसांनी तातडीने या तिघांना पनवेल उपजिल्हा रुग्णालयात हलविले. परंतु वैद्यकीय अधिकार्यांनी मुलीला मृत घोषित केले.