औरंगाबादेत माजी क्रिकेटर मोहम्मद अझरुद्दीन विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2020 06:42 PM2020-01-22T18:42:10+5:302020-01-22T18:49:50+5:30
माजी कर्णधार क्रिकेटर मोहंमद अझरुद्दीन, त्याचा स्वीय सहायक आणि अन्य एका जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे
औरंगाबाद : देशविदेशातील विमान प्रवासाची तिकिटे ऑनलाईन बुकिंग करायला सांगून तिकिटाचे पैसे न देता २१ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार क्रिकेटर मोहम्मद अझरुद्दीन, त्याचा स्वीय सहायक आणि अन्य एका जणाविरुद्ध ट्रॅव्हल एजन्सीच्या तक्रारीवरून सिटीचौक पोलीस ठाण्यात मंगळवारी रात्री गुन्हा नोंदविण्यात आला.
मोहम्मद अझरुद्दीन (रा. विजयवाडा, हैदराबाद), स्वीयसहायक सुदेश अव्वेकल (रा. कन्नोर, केरळ) आणि मुजीब खान (रा. बेगमपुरा), अशी आरोपींची नावे आहेत. सिटीचौक पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार मोहम्मद शाहाब मोहंमद याकूब (४९, रा. लेबर कॉलनी) हे दानीश टुर्स अॅण्ड ट्रॅव्हलमध्ये तिकीट बुकिंग करण्याचे काम करतात. आरोपी मुजीब खान हे त्यांच्या ओळखीचे आहेत. ८ नोव्हेंबर २०१९ रोजी मुजीब यांनी मोहंमद शाहाब यांना फोन करून, माजी क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीनचे स्वीयसहायक सुदेश यांना विमान प्रवासाचे तिकीट बुकिंग करायचे आहे. त्यांचे तिकीट बुक करा. पैशाची चिंता करू नका, असे सांगितले. यानंतर आरोपी सुदेशने त्यांना कॉल करून मुंबई ते दुबई- पॅरिस प्रवासाचे ९ नोव्हेंबर रोजी आणि १२ रोजी परतीचे पॅरिस, दुबई ते दिल्ली ३ लाख ६१ हजार ९९५ रुपयांचे तिकीट बुकिंग केले. १२ रोजी सुदेश यांच्या नावाचे मुंबई ते दुबई- पॅरिस आणि १२ रोजी पॅरिस- दुबई- दिल्ली, अशा प्रवासाचे ३ लाख ६१ हजार ९९५ रुपयांचे तिकीट बुकिंग केले.
या तिकिटाच्या पैशाविषयी मोहम्मद शाहाब यांनी मुजीब यांच्याकडे विचारणा केली तेव्हा या तिकिटाचे पैसे ते स्वत: देणार आहेत. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका, असे खात्रीने सांगितले. तक्रारदारांकडून बँक खाते क्रमांक विचारून घेऊन खात्यात पैसे पाठवितो, असे सांगितले. मात्र, मुजीब यांनी पैसे पाठविले नाहीत. ९ नोव्हेंबर रोजी मुजीब यांच्या सांगण्यावरून १० नोव्हेंबर रोजीचे बराक आणि दमीर या नावे झगरब- मुनीक-टरीन यादरम्यान विमान प्रवासाचे ऑनलाईन तिकीट बुक केले. या तिकिटाचे मूल्य ९८ हजार ४०० रुपये होते. १० नोव्हेंबरला १ लाख ७० हजार ९०० रुपये किमतीचे सुदेशच्या विमान प्रवासाच्या तिकिटाचे पैसे दिले आणि ११ लाख ३ हजार २१ रुपये किमतीची अन्य वेगवेगळ्या प्रवासाची तिकिटे गोड बोलून काढून घेतली. मात्र, वारंवार मागणी करूनही आरोपींनी पैसे न दिल्याने २२ जानेवारी रोजी शाहाब यांनी सिटीचौक ठाण्यात फसवणुकीची तक्रार नोंदविली. पोलीस निरीक्षक संभाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक नागरे हे तपास करीत आहेत.