आयुर्वेदाच्या विद्यार्थ्याची रॅगिंगला कंटाळून आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2020 04:31 AM2020-02-09T04:31:43+5:302020-02-09T04:31:46+5:30
बीड जिल्ह्यात मूळ गाव । उदगीरला घेत होता शिक्षण
बीड : उदगीरच्या धन्वंतरी आयुर्वेद महाविद्यालयात बीएएमएसच्या प्रथम वर्षात शिक्षण घेणाऱ्या बीड जिल्ह्यातील नाळवंडी गावातील गणेश कैलास म्हेत्रे (२०) या विद्यार्थ्याने रॅगिंगच्या त्रासाला कंटाळून स्वत:ला संपविले. शुक्रवारी त्याने विष घेतले होते. बीडच्या खासगी रुग्णालयात शनिवारी पहाटे त्याचा मृत्यू झाला.
नाळवंडीचे सरपंच व गणेशचे काका राधाकृष्ण म्हेत्रे यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याला सतत रॅगिंगचा त्रास होत होता. ‘तू खेड्यातला आहेस, डॉक्टर काय होणार’ अशा शब्दांत त्याचा अपमान केला जात असे. याशिवाय शारीरिक व मानसिक छळही केला गेला. याविषयी गणेशने अनेकदा घरी सांगितले होते. या तक्रारी ऐकून गणेशचे शिक्षक असलेले काका दामोदर व वडील कैलास यांनी महाविद्यालयाचे प्रशासन व संबंधित प्राध्यापकाकडे तोंडी तक्रारही केली होती. यापुढे आपल्या मुलास त्रास होणार नाही, याची आम्ही काळजी घेऊ, असे आश्वासन दिल्यामुळे गणेश पुन्हा महाविद्यालयात गेला होता. मात्र रॅगिंगचा त्रास वाढतच गेला. फी भरली असताना कॉलेज सोडले तर पैसे बुडतील, या भीतीने तो शिकत होता.
चार दिवसांपूर्वी तो गावी परत आला. यावेळीही त्याने रॅगिंगच्या त्रासाविषयी सांगितले. पण पुन्हा शिकायला जाण्यासही तो तयार झाला. काका राधाकृष्ण यांचा ७ फेब्रुवारीला वाढदिवस साजरा करून दुपारनंतर तो जाणार होता. पण सकाळी चहा घेऊन दुपारी जेवायला येतो म्हणून तो शेतात गेला. शेतात गेल्यानंतर त्याने विष प्राशन केले. दुपारी घरी आला, त्यावेळी त्याला उलटी झाली. तरीही त्याने काही सांगितले नाही.
घरच्यांनी गणेशला रुग्णालयात दाखल केले. मात्र, विष हे शरीरात भिनल्याने आज पहाटे त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर याप्रकरणी जिल्हा रुग्णालयातील पोलीस चौकीत राधाकृष्ण म्हेत्रे यांनी जवाब दिला.
महाविद्यालयात रॅगिंग झालेले नाही. त्याचे रॅगिंग होत असल्याचे त्याच्या कुणाही नातेवाइकांनी सांगितले नव्हते.
- डॉ. दत्ता पाटील, प्राचार्य, धन्वंतरी आयुर्वेदिक महाविद्यालय, उदगीर