ढाका : एका व्यावसायिकाने बलात्काराचा आणि खून करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप बांगलादेशी अभिनेत्री शमसुन्नहर स्मृतीने केल्यानंतर त्या व्यावसायिकाला अटक करण्यात आली आहे.
पोरी मोनी या नावाने परिचित असलेली अभिनेत्री शमसुन्नहर स्मृतीने फेसबुकवरील पोस्टवर याप्रकरणी पंतप्रधान शेख हसीना यांच्याकडे न्यायाची मागणी केली होती.रविवारी रात्री तिने पत्रकार परिषद घेऊन स्थावर मालमत्ता व्यावसायिक आणि ढाका बोट क्लबचे मनोरंजन आणि सांस्कृतिक व्यवहार सचिव नसीर यू. महमूद यांनी हल्ला केल्याचा आरोप केला होता. सोमवारी अभिनेत्री शमसुन्नहर स्मृतीने व्यावसायिक नसीर यू. महमूद आणि अन्य चौघांविरुद्ध तक्रार दाखल केली. चार दिवसांपूर्वी नसीरने ढाक्यातील क्लबमध्ये माझ्यावर हल्ला केला, असा आरोप तिने तक्रारीत केला आहे.
या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी धाड टाकून व्यावसायिक नसीर आणि अन्य चौघांना अटक केली. अटक करण्यात आलेल्या दोघांच्या नावाचा एफआयआरमध्ये समावेश असून अन्य तिघे त्यांचे साथीदार आहेत, असे डेली स्टारच्या वृत्तात म्हटले आहे.
पार्ट्या आयोजित करून महिलांचे शोषण...nढाका महानगर पोलिसच्या गुप्तचर शाखेचे सह-आयुक्त हारुण ऊर्फ रशिद यांनी सांगितले की, धाडीदरम्यान दारू आणि अमली पदार्थ जप्त करण्यात आल्याने या पाच जणांविरुद्ध अमली पदार्थ नियंत्रण कायद्याखालीही गुन्हा दाखल केला जाईल. आरोपी विविध क्लबमध्ये पार्ट्या आयोजित करायचा. तेथे महिलांचे शोषण केले जायचे. आरोपींविरुद्ध अन्य लोकांनीही तोंडी तक्रारी केल्या आहेत. यापैकी एखाद्याने तक्रार दाखल केल्यास गुप्तचर विभाग कायदेशीर कारवाई करील.
nतत्पूर्वी, अभिनेत्री शमसुन्नहर स्मृतीने फेसबुकवरील पोस्टवर पंतप्रधान हसीना यांना आई संबोधत दावा केला की, मी कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांकडे मदत मागितली; परंतु, न्याय मिळाला नाही. मला न्याय कोठे मिळेल. चार दिवसांपासून न्यायासाठी भटकत आहे. प्रत्येक जण माझे ऐकून घेतात, परंतु, कारवाई कोणीही करीत नाही. मी एक मुलगी आणि अभिनेत्री आहे; परंतु, त्या आधी मी एक माणूस आहे, मी गप्प राहू शकत नाही, असे तिने बांगला भाषेतील पोस्टमध्ये म्हटले आहे.