नांदेड : शहरातील शंकर नागरी सहकारी बँकेचे आयडीबीआय बँकेत असलेले साडेचौदा कोटी रुपये हॅकर्सनी लंपास केले होते. या प्रकरणात वजिराबाद पोलिसांनी दोन महिलांसह एका संशयिताला दिल्ली येथून ताब्यात घेतले आहे. त्यांना ३० जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या हॅकर्सला बँकेचा डाटा पुरविणारी एखादी टोळी असून, त्यांचा बँकेशी संबंध असल्याच्या निष्कर्षापर्यंत पोलीस पाेहोचले आहेत.शंकर नागरी सहकारी बँकेचे १४ कोटी ४६ लाख ४६ हजार रुपये आयडीबीआय बँकेच्या खात्यातून आरटीजीएसच्या माध्यमातून हॅकर्सने लंपास केले. या प्रकरणात सायबर सेलकडूनही तपास करण्यात येत आहे. या प्रकरणात वजिराबाद पोलिसांनी दिल्ली येथून एकाला आणि शेजारील कर्नाटकमधून दोन महिलांना ताब्यात घेतले. यातील एका महिलेचे नायजेरीयन फ्रॉड करणाऱ्याशी संबंध असल्याचे उघडकीस आले आहे. दिल्लीच्या मोहनपुरा भागात नायजेरियनबहुल वस्ती आहे. या ठिकाणाहूनच हॅकिंगचे प्रकार केले जातात. तिन्ही आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आतापर्यंतच्या तपासावरून हॅकर्सला बँकेचा डाटा पुरविणारी एखादी टोळी असून, कमिशनवर ही टोळी हॅकर्सला ग्राहकांचा डाटा विकत असल्याची माहिती हाती आली आहे.
हॅकर्सला कमिशनवर पोहोचविला बॅंकेचा डाटा? ; आयडीबीआय खात्यातून पैसे वळविल्याचे प्रकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2021 6:23 AM