मुंबई : बँकेचा अधिकारी वेश्याव्यवसायासाठी परदेशी तरुणी पुरवत असल्याची धक्कादायक माहिती गुन्हे शाखेच्या कारवाईतून समोर आली. या प्रकरणी गुन्हे शाखेने नदीम नशीर खान (२६) याला अटक केली आहे.
खान हा साकीनाक्याचा रहिवासी असून एका नामांकित बँकेत अधिकारी पदावर कार्यरत आहे. तो गेल्या चार वर्षांपासून सेक्स रॅकेटमध्ये असल्याची माहिती समोर येत आहे. या सेक्स रॅकेटबाबत समजताच गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अकबर पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या कक्ष ७ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश तावरे यांच्या पथकाने नियोजित ठिकाणी सापळा रचला.
ठरल्याप्रमाणे बनावट ग्राहक बनून खानशी संपर्क केला. त्याने, एका परदेशी मुलीमागे ६० हजार तसेच राहण्याच्या व्यवस्थेबरोबरच अन्य बाबींसाठी आणखी ३० हजारांचा खर्च सांगितला. त्यानुसार, त्याला पैसे देताच त्याने अन्य दलालासोबत फोनवरून संपर्क साधत गुरुवारी दोन परदेशी महिलांना मालाडच्या नामांकित हॉटेलमध्ये बोलावून घेतले. दलाल महिलांना घेऊन तेथे आला. खानने त्यांना पैसे देताच गुन्हे शाखेने त्याला दलाली तसेच वेश्याव्यवसायप्रकरणी गुन्हा दाखल करत ताब्यात घेतले.
महिलांच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीत, दोन महिला उझबेकिस्तान येथून दिल्लीत पर्यटक म्हणून आल्या होत्या. त्यांना, जास्तीच्या पैशांचे आमिष दाखवून वेश्याव्यवसायासाठी मुंबईत आणल्याचे त्यांनी पोलिससांना सांगितले. पोलिसांकडून या दोन्ही महिलांची सुटका करण्यता आली असून अटक करण्यात आलेल्या खानची अधिक चौकशी करण्यात येत आहे. त्याचा मास्टरमाइंड दिल्लीत असल्याच्या शक्यतेवरून त्याचा शोध सुरू आहे.