गांधीजींच्या पुतळ्यालाच नक्षलवाद्यांनी बांधले बॅनर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2020 08:11 PM2020-02-10T20:11:18+5:302020-02-10T20:12:41+5:30
महात्मा गांधींच्या पुतळ्यालाच नक्षलवाद्यांनी रविवारी रात्री बॅनर बांधले. त्यामुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे.
एटापल्ली (गडचिरोली) : एटापल्लीपासून १० किमी अंतरावर असलेल्या उडेरा ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोरील मुख्य चौकात असलेल्या महात्मा गांधींच्या पुतळ्यालाच नक्षलवाद्यांनी रविवारी रात्री बॅनर बांधले. त्यामुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे.
आदिवासी सेवा सहकारी संस्था उडेरामार्फत धान खरेदी केंद्र चालविले जात आहे. या केंद्राचे संचालक २० टक्के कमिशन घेऊन व्यापारी वर्गाचे धान खरेदी करीत आहेत. त्यामुळे शेतक-यांचे मोठे नुकसान होत आहे. हा प्रकार थांबवावा अन्यथा संचालकांवर नक्षलवाद्यांमार्फत कडक कारवाई केली जाईल, असे नक्षल बॅनरवर नमूद केले आहे. दंडकारण्य आदिवासी किसान मजदूर संघटन व पेरमिली एरिया कमिटी असे बॅनरवर लिहिण्यात आले आहे. नक्षल बॅनरवर दोन केंद्र संचालकांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे एकच खळबळ माजली आहे. उडेरा ते बुर्गी मार्गावर नक्षल पत्रके सुध्दा आढळून आली. सोमवारी सायंकाळी हे पत्रके व बॅनर पोलिसांनी जप्त केले.