उपमुख्यमंत्री अजित पवार यांची खोटी सही करून फसविणाऱ्याला बारामती पोलिसांनी ठोकल्या बेड्या
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2020 08:43 PM2020-10-17T20:43:07+5:302020-10-17T20:49:07+5:30
प्रशासनावर वचक असणाऱ्या अजितपवारांसोबतच असा प्रकार घडल्याने खळबळ
बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार यांची खोटी सही करून खाजगी सचिव असल्याचे भासवून तोतयागिरी करून फसवणुक केल्याप्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रशासनावर वचक असणाऱ्या ‘अजितदादां’ बाबतच असा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रक़रणी अजय कामदार (वय ६४, रा.मुंबई ) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार गुन्हयातील आरोपी तुषार तावरे (रा.तारांगण सोसायटी, बारामती, जि.पुणे) यास अटक करण्यात आली आहे. तावरे याने बुधवारी (दि १४ ऑक्टोबर) कामदार यांच्या मोबाईल नंबरवर संपर्क साधला. '' मी उपमुख्यमंत्री कार्यालयातुन बोलतोय ,अजितदादा पवार यांच्याकडे आपल्याविरुध्द तक्रार आल्याचे सांगितले. तक्रार तुम्हास व्हॉट्सअपला पाठविली आहे. ती बघण्यास सांगितले. त्यावर कामदार यांनी संबंधित व्हॉट्सअपवर मेसेज व तक्रार अर्ज पाहिले . त्यावर त्यांचे बांधकाम व्यवसायासंदर्भात तक्रारी अर्जावर उपमुख्यमंत्र्यांचा तात्काळ कारवाई करावी, असा शेरा होता...''
त्यामुळे कामदार यांनी घाबरून आरोपी तावरे यांना संपर्क साधला. तावरे यांनी त्यांना तुमच्याविरुध्द दिलेला अर्ज मी कमिशनरकडे न पाठवता माझ्याकडे ठेवला आहे. तुमचे व अर्जदाराचे वाद तीन दिवसात मिटवुन घ्य ,नाहीतर आपले विरूध्द कडक कारवाई होईल असे सांगितले.तसेच संबंधित निवेदनावर अजितदादा यांची सही आहे, असे सांगुन प्रकरण मिटवुन घेण्यास सांगितले.
मात्र, कामदार यांना शंका आल्याने उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयास संपर्क साधला. मात्र, तुषार तावरे नावाचा कोणीही व्यक्ती कार्यालयात काम करत नाही. अजितदादा उदया बारामतीत आहेत. त्यांना जावुन सर्व प्रकार सांगा असे त्यांना सांगण्यात आले. त्यावर कामदार हे बारामतीमध्ये आले व त्यांनी उपमुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक सुनिल मुसळे यांना हा सर्व प्रकार सांगितला. मुसळे यांनी कायदेशीर कारवाई करण्याची सुचना केली. त्यानंतर कामदार यांनी फिर्याद दिली. त्यानुसार तोतयागिरी करून फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्हयात इतरांचा सहभाग असल्याचा पोलिसांचा संशय आहे. याबाबतचा शोध पोलीस घेत आहेत.
अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक पद्मराज गंपले करीत आहेत. दरम्यान, अशा कोणत्याही व्यक्तीने तोतयागिरी वरून उपमुख्यमंत्र्यांच्या स्वीय सहाय्यक ,खाजगी सचिव अगर कार्यालयातील अधिकारी असल्याचे सांगत फसवणुक केली असल्यास पोलीसांशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.