नवी मुंबई - मद्यपानाच्या बिलात सवलत मागितल्याने दोघा ग्राहकांना जबर मारहाण झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी सीबीडी पोलीस ठाण्यात बारच्या कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, हा बार मध्यरात्री तीन वाजेपर्यंत सुरू असताना ही घटना घडली आहे.सीबीडी सेक्टर १५ येथील सिक्वेन्स बारमध्ये २ फेब्रुवारीला पहाटेला ही घटना घडली आहे.सीवूड येथे राहणारे केदारनाथ पाटील, विठ्ठल चव्हाण व हरिनाथ माने हे त्या ठिकाणी मद्यपान करण्यासाठी बसले होते. काही वेळाने माने त्या ठिकाणावरून निघून गेल्यानंतर पाटील व चव्हाण दोघेच मध्यरात्रीपर्यंत तिथे बसले होते. अखेर पहाटे तीनच्या सुमारास त्यांनी बिल मागविले असता, वेटरने त्यांना ३० हजार रुपयांचे बिल दिले. मात्र, नियमित ग्राहक असल्याने मालक ओळखीचा असल्याचे सांगत, पाटील यांनी मॅनेजरकडे बिलात सवलत मागितली, परंतु त्यांनी सवलत मिळणार नसल्याचे सांगितल्यानंतरही पाटील यांनी २५ हजार रुपये भरून बारमधून निघू लागले. याच वेळी पाठीमागून आलेल्या बारच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना बिलात सवलत मिळणार नसल्याचे सांगत बाकीच्या पैशांची मागणी केली. यावरून त्यांच्यात शाब्दिक वाद झाला असता, बारच्या वेटर व इतर कर्मचाऱ्यांनी पाटील व चव्हाण यांना जबर मारहाण केली. याचदरम्यान पोलिसांचे गस्ती वाहन तेथे आल्याने या दोघांची त्यांच्या तावडीतून सुटका झाली. या घटनेत जखमी झालेल्या दोघांनी पालिका रुग्णालयात दाखल केल्यानंतर, त्यांनी बुधवारी सीबीडी पोलिसांकडे तक्रार केली आहे. त्यानुसार, बारच्या कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्नया घटनेवरून सिक्वेन्स बार हा पहाटे तीन वाजेपर्यंत सुरू होता, हे समोर आले आहे. यापूर्वी नेरुळमध्येही मध्यरात्रीपर्यंत सुरू असलेल्या बारमध्ये हाणामारी झाली होती. त्यानंतरही दोन्ही बारवर पोलिसांकडून कारवाई झालेली नाही. यावरून बार व्यावसायिकांना उत्पादन शुल्क आणि पोलीस यांचे छुपे पाठबळ मिळत असल्याचे दिसून येत आहे. परिणामी, सातत्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे.