भिवंडी: भिवंडीसह ठाणे,मुंबई,नवी मुंबई,वसई या भागात घरफोडी करणाऱ्या अट्टल चोरट्यास भिवंडी गुन्हे शाखेने अटक करीत त्या जवळून दोन लाख किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करीत सात गुन्ह्यांची उकल केली असल्याची माहितीइ शनिवारी दिली आहे.मोहमद अस्लम इजराईल शेख उर्फ कुरेशी वय ४८, रा.शास्त्रीनगर,कलीना,मुंबई असे अटक आरोपीचे नाव आहे .
नारपोली पोलीस ठाणे हद्दीत ८ जानेवारी रोजी झालेल्या एक घरफोडीचा तपास नारपोली पोलिसांसह भिवंडी गुन्हे शाखा करीत होती.गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड यांना १० फेब्रुवारी रोजी तांत्रिक माहिती सह मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारे सपोनि विजय मोरे,धनराज केदार,सपोउपनिरी रामचंद्र जाधव,राजेंद्र चौधरी,पोहवा राजेश शिंदे,मंगेश शिर्के,साबीर शेख,सचिन जाधव,भावेश घरत,प्रशांत बर्वे,रविंद्र साळुंखे, डोंगरे या पोलीस पथकाने कलीना, मुंबई येथून मोहमद अस्लम इजराईल शेख उर्फ कुरेशी या संशयितास ताब्यात घेवुन त्याचेकडे केलेल्या चौकशीत त्याने नारपोली पोलीस ठाणे हद्दीत दाखल घरफोडीच्या गुन्ह्याची कबुली दिली.
त्याकडे अधिक तपास केला असता त्याच्या चार साथीदारांच्या मदतीने भिवंडी परिसरात केलेल्या चार तर मुंबई धारावी, पडघा व नवघर वसई येथे केलेल्या घरफोडीच्या गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्या जवळून नारपोली गुन्ह्यात चोरीस गेलेल्या २ लाख १० हजार रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांपैकी ८० हजार किमतीचे व इतर गुन्ह्यातील एकूण ९० ग्रॅम सोन्याचे दागिने २ लाख १ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.मोहमद अस्लम इजराईल शेख उर्फ कुरेशी हा घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी १६ घरफोडीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.