झोपेत असताना दोन्ही मुलांचा कापला गळा; विष पिऊन आईवडिलांचा आत्महत्येचा प्रयत्न, पण...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2021 04:33 PM2021-08-28T16:33:13+5:302021-08-28T16:34:44+5:30
मिसरोद ठाण्याच्या हद्दीत रवी ठाकरे त्यांची पत्नी आणि दोन मुलांसह राहत होते. मागील काही काळापासून रवी ठाकरे यांची नोकरी गेल्याने ते चिंतेत होते.
भोपाळ – मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये एका कुटुंबात एक ह्दयद्रावक घटना समोर आली आहे. याठिकाणी एका पित्यानं १६ वर्षीय मुलगा आणि १४ वर्षीय मुलीचा टाइल्स कटरनं गळा चिरला. त्यानंतर आई-वडिलांनी विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. बेरोजगारी आणि आर्थिक तंगीमुळे त्रस्त होऊन या दाम्पत्याने हे टोकाचं पाऊल उचललं आहे. पोलीस सध्या या घटनेचा तपास करत आहेत. परंतु या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
या घटनेत मुलगा आणि पती दोघांचे निधन झाले तर मुलगी, पत्नीवर उपचार सुरु आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मृत व्यक्ती सिविल इंजिनिअर हा खूप दिवसांपासून बेरोजगार होता. आर्थिक समस्येमुळे त्रस्त होऊन त्याने धक्कादायक निर्णय घेतला. रवी ठाकरे हे कुटुंबासह १०२ मल्टी सहारा परिसरात राहत होते. कुटुंबात पत्नी रंजना ठाकरे, मुलगा चिराग ठाकरे आणि मुलगी गुंजन ठाकरे यांचा समावेश आहे. शनिवारी सकाळी ८.३० च्या सुमारास घरातील कुठलाही सदस्य उठला नाही म्हणून शेजाऱ्यांना संशय आला. त्यांनी खिडकीतून डोकावून पाहिल्यानंतर ते हैराण झाले. त्यांनी या घटनेची माहिती स्थानिक पोलिसांना दिली.
तात्काळ पोलीस घटनास्थळी पोहचले त्यांनी चौघांना हॉस्पिटलला नेलं. ज्याठिकाणी डॉक्टरांनी रवी आणि त्यांचा मुलगा चिरागला मृत घोषित केले. तर पत्नी रंजना, मुलगी गुंजन यांच्यावर उपचार सुरु आहेत. रंजनाने पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार, आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने आम्ही हे टोकाचं पाऊल उचललं. रात्री २ च्या सुमारास मुलं झोपलेली असताना टाइल्स कटरनं पती रवी यांनी चिरागचा गळा कापला. त्यानंतर दोघा दाम्पत्याने मुलीचा गळाही कापण्याचा प्रयत्न केला तितक्यात मध्येच कटर बंद पडलं. त्यानंतर दोघांनी विष प्राशन केले. घटनास्थळी मिळालेल्या सुसाईड नोटनुसार आर्थिक तंगीनं आत्महत्या करत असल्याचा उल्लेख आहे.
अतिरिक्त पोलीस अधीक्षक राजेश भदौरिया म्हणाले की, मिसरोद ठाण्याच्या हद्दीत रवी ठाकरे त्यांची पत्नी आणि दोन मुलांसह राहत होते. मागील काही काळापासून रवी ठाकरे यांची नोकरी गेल्याने ते चिंतेत होते. तर त्यांची पत्नी रंजना यांच्यावर मानसिक तणाव होता. पत्नी ब्यूटी प्रोडक्ट्स विकण्याचं काम करत होती. पंरतु काही काळाने ते बंद पडलं. कुटुंबाची आर्थिक स्थिती ढासळत चालली होती. घरगुती वाद वाढले. त्यामुळे रवीने सुरुवातीला मुलगा चिराग आणि मुलगी गुंजन यांचा गळा कापण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर स्वत: आणि पत्नी रंजना यांनी विष घेतलं. त्यानंतर ठाकरे कुटुंबाच्या शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीनं माहिती मिळताच पोलिसांना कळवलं. जेव्हा पोलीस घटनास्थळी पोहचले तेव्हा संपूर्ण कुटुंब बेशुद्ध अवस्थेत आढळलं. घटनास्थळी विषाची बाटली आणि रक्तानं माखलेला कटरही पडला होता.