मनी लाऊण्डरिंग म्हणजेच पैशाची अफरातफर आणि बेहिशेबी मालमत्तेचे आरोप असलेल्या राजकीय नेते मंडळी आणि सेलिब्रिटींवरील कारवाई आणि चौकशांमुळे चर्चेत आलेली तपास यंत्रणा, ईडीचे (अंमलबाजवणी संचालनालय) मुंबईतील कार्यालय लवकरच नव्या जागेत हलवण्यात येणार आहे. सध्या दक्षिण मुंबईतील बॅलर्ड पिअर येथे ईडीचे मुंबईतील कार्यालय आहे. आता ते वरळी येथे हलवण्यात येईल. वरळीतील ईडीच्या कार्यालयाची जागा कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचा हस्तक इकबाल मिर्ची याची आहे. इक्बाल मिर्चीच्या निधनानंतर त्याच्या मालकीचे वरळीतीली सीजे हाऊस ही जागा एकेकाळी ड्रग्ज तस्करीसाठी वापरली जात होती, आता तिथेच ईडीचे कार्यालय उभे राहणार आहे.
कुख्यात गुंड इक्बाल मिर्चीने सीजे हाऊसची जागा मिलेनियम डेव्हलपर्सला विकली होती. त्यानंतर याठिकाणी इमारत उभी राहिली होती. या इमारतीमध्ये इक्बाल मिर्चीच्या कुटुंबीयांना ५ हजार चौरस फूट आणि ९ हजार चौरस फुटाच्या दोन अलिशान फ्लॅट्स मिळाले होते. इमारतीच्या तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर हे फ्लॅट्स आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ईडीने इक्बाल मिर्चीच्या या दोन्ही मालमत्ता ताब्यात घेतल्या होत्या. याच जागेत आता ईडीचे नवीन कार्यालय थाटण्यात येईल.१९८६ मध्ये इक्बाल मिर्ची याने ही मालमत्ता मोहम्मदकडून दोन लाख रुपयांना विकत घेऊन पहिली पत्नी हाजरा हिच्या नावावर केली होती.
विशेष म्हणजे ईडीने मनी लाँड्रिंग प्रकरणात मृत गँगस्टर इक्बाल मिर्ची याच्या कुटुंबाची आणखी २२.४२ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली. यात विविध सात बँक खात्यांतील ठेवींसह पाचगणीतील सिनेमा हॉल, मुंबईतील हॉटेल, फार्महाउस, दोन बंगले आणि भूखंड आदींचा समावेश असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले होते.
मालमत्तेवर टाच आणण्याचे आदेश मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यान्वये (पीएमएलए) जारी केले होते. १९९३ च्या बॉम्बस्फोटातील फरार आरोपी इक्बाल मिर्चीचे २०१३ मध्ये लंडनमध्ये निधन झाले. त्याच्या मालकीची मुंबईसह देशभरात मिळकती असून त्या हवालामार्फत त्यातून शेकडो कोटीचे गैरव्यवहार करण्यात आल्याचे ईडीच्या तपासातून स्पष्ट झाले. मिर्चीच्या वरळी येथील सीजे हाऊस तिसऱ्या व चौथ्या मजल्यावरील फ्लॅट, ताडदेव येथील अरुण चेबर्स येथील कार्यालय, वरळीतील साहिल बंगल्यातील तीन फ्लॅट, क्रॉफर्ड मार्केट येथील तीन दुकान गाळे आणि लोणावळा येथील बंगला व भूखंड डिसेंबर २०१९ मध्ये जप्त केला. या सर्व मालमत्तेची किंमत अंदाजे ६०० कोटी असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
सीजे हाऊस इमारतीच्या जागेत पूर्वी इक्बाल मिर्चीच्या वेळी फिशरमॅन वार्फ हा पब होता. वरळीचे प्रसिद्ध गुरुकृपा हॉटेलही याच जागेत होते. या इमारतीच्या सर्वात वरच्या मजल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांचा ३५ हजार चौरस फुटांचा फ्लॅट आहे.
इकबाल मिर्चीची पत्नी आणि मुले फरार आर्थिक गुन्हेगार
कुख्यात गॅंगस्टार इकबाल मिर्चीची पत्नी हजरा मेमन आणि जुनैद व असिफ मेमन ही दोन मुले यांना फेब्रुवारी २०२१ मध्ये विशेष पीएमएलए कोर्टाने फरार आर्थिक गुन्हेगार घोषित केले होते.
अंमलबजावणी संचालनालयाने कायदेशीर प्रक्रिया पूूर्ण करून या कुटुंबीयांची भारतात तसेच परदेशात या कुटुंबीयांची मालमत्ता जप्त करण्याचे आदेशही कोर्टाने दिले आहेत. डिसेंबर महिन्यात अंमलबजावणी संचालनालयाने या तिन्ही लोकांना आर्थिक गुन्हे कायद्यान्वयेप्रमाणे आर्थिक गुन्हेगार घोषित करावे यासाठी विशेष न्यायालयात धाव घेतली होती. तसेच, देशभरातील सुमारे ९६ कोटींच्या १५ मालमत्ता आणि सहा ब’ क खात्यातील १.९ कोटी रुपये जप्त करण्याची परवानगी मागितली होती.