समस्तीपूर – बिहारच्या समस्तीपूर जिल्ह्यात माणुसकीला लाजवणारी घटना घडली आहे. याठिकाणी एका गावात शौचालयासाठी बाहेर गेलेल्या एका महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याचं समोर आलं आहे. इतकचं नाही तर या प्रकारानंतर अज्ञातांनी बेशुद्ध पडलेल्या महिलेला नग्नवस्थेत विजेच्या खांबाला लटकवून फरार झालेत. घटनेची माहिती मिळताच तातडीने पोलीस गावात दाखल झाले. या महिलेला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.
कुटुंबाच्या माहितीनुसार, चकहबीब गावातील एक महिला पहाटे शौचालयासाठी घरातून बाहेर पडली होती. त्यावेळी निर्जनस्थळी काही अज्ञातांनी या महिलेले एकटं गाठलं. त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. महिलेने याचा विरोध केला असता आरोपींनी तिला बेदम मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. या क्रूर प्रकारानंतर आरोपींनी या महिलेला नग्न अवस्थेत विजेच्या खांब्याला दोरीनं लटकवलं. महिलेचा मृत्यू झाल्याचं समजून ते तिथून फरार झाले.
काही तासानंतर जेव्हा गावातील लोक शेतात निघाले असता त्यांना महिला बेशुद्ध अवस्थेत विजेच्या खांबाला लटकलेली दिसली. त्यानंतर पोलिसांना याची माहिती देताच ते घटनास्थळी पोहचले. या महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या ही महिला मृत्यूशी झुंज देत आहे. पीडित महिलेच्या घरी लग्नाचा समारंभ होता. त्यामुळे मंडप आणि इतर कामांसाठी तिथे मजूरही आले होते. मंगळवारी सकाळी जेव्हा ही महिला घराबाहेर पडली तेव्हा काही मजुरांनी तिचा पाठलाग केला. या महिलेला चहुबाजूने घेरलं त्यानंतर महिलेचे सोने आणि कपडे काढून तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा संशय पोलिसांना आहे.
रागाच्या भरात गावकऱ्यांनी ७ जणांना बांधून ठेवलं
महिलेसोबत घडलेला क्रूर प्रकार पाहून संतापलेल्या लोकांनी संशयाच्या आधारे मंडप उभारणाऱ्या ७ मजुरांना डांबून ठेवलं. घटनेच्या माहितीनंतर पोलिसांनी या सर्वांना ताब्यात घेतलं आहे. पोलीस या सर्वांची कसून चौकशी करत आहेत.
पीडिता बोलण्याच्या स्थितीत नाही
सध्या पीडित महिलेची तब्येत इतकी गंभीर असून ती पोलिसांना काहीच सांगण्याच्या मनस्थितीत नाही. महिला पोलीस अधिकारी पुष्पलता कुमारी यांनी सांगितले की, लग्नाच्या समारंभानंतर जेव्हा पहाटे ही महिला शौचालयासाठी गेली तेव्हा काही जणांनी तिच्यावर अत्याचार केले. नेमकं काय घडलं हे पीडित महिलेच्या जबाबानंतर स्पष्ट होईल. पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला असून ७ संशयितांची चौकशी सुरू आहे.