सदानंद नाईक
उल्हासनगर : सोशल मीडियावर शिवसेने विरोधात भूमिका घेण्याऱ्या भाजप नगरसेवकाला शिवसेना व युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिका मुख्यालयासमोर अंगावर शाई टाकून मारहाण केली. याप्रकरणी आरोपींना त्वरित अटक करण्याची मागणी भाजपच्या शिष्टमंडळाने पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांच्याकडे केली.
उल्हासनगरात मंगळवारी भाजप नेते व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वक्तव्याचा भाजपकडून निषेध होत असताना, दुसरीकडे सोशल मीडियावर शिवसेना व पक्षाच्या प्रमुख नेत्यावर सातत्याने टीका करणाऱ्या भाजप नगरसेवक प्रदीप रामचंदानी यांना त्यांच्या कार्यालया बाहेर व महापालिका मुख्यालयासमोर शिवसैनिक व युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी अंगावर काळी साई टाकून मारहाण केली. या मारहाणीचा शहर भाजपने निषेध करून रामचंदानी यांच्या तक्रारी वरून मध्यवर्ती पोलीस ठाण्यात युवा सेनेचे अधिकारी बाळा श्रीखंडे, महेंद्र पाटील, ज्ञानेश्वर मरसाळे, संदीप गायकवाड, मोहम्मद शेख, विनोद सालेकर, अशोक खेत्रे, अस्लम यांच्यासह अन्य ३ ते ४ इसमावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मारहाणीत जखमी झालेले प्रदीप रामचंदानीसह मुलावर मध्यवर्ती रुग्णालयात उपचार करून उशिरा रात्री घरी सोडण्यात आले.
भाजपा आमदार कुमार आयलानी यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या शिष्टमंडळाने, बुधवारी दुपारी पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांची भेट घेऊन, आरोपींना अटक करण्याची मागणी केली. पोलीस आरोपींना त्वरित अटक करतील, अशी प्रतिक्रिया आमदार कुमार आयलानी यांनी दिली. शिष्टमंडळात भाजपचे शहरजिल्हाध्यक्ष जमनुदास पुरस्वानी, नगरसेवक राजेश वधारीया, महेश सुखरामनी, पक्षाचे प्रदेश सदस्य प्रकाश माखीजा, कपिल अडसूळ, राजू जग्यासी आदीजन उपस्थित होते. मारहाण प्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालातरी, बुधवारी सायंकाळी पर्यंत कोणालाही अटक केली नाही. अशी प्रतिक्रिया सहायक पोलिस उपायुक्त डी टी टेळे यांनी दिली. शिवसैनिक व युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांची मारहाण प्रकरणी उत्स्फुर्त प्रतिक्रिया असल्याची माहिती शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी दिली.
हीतर अंतर्गत वादातून मारहाण
शहरातील सोशल मीडियावर शिवसेना पदाधिकारी व भाजप नगरसेवक प्रदीप रामचंदानी यांच्यात अनेकदा वाद झाले. याच वादातून शिवसेना व युवासेनेच्या पदाधिकार्यांनी मारहाण केल्याचा टीका भाजप कडून होत आहे. या मारहाणीचा संबंध केंद्रीयमंत्री राणे यांच्या वक्तव्य प्रकरणासी नाही. असे मत भाजपचे शहराध्यक्ष जमनुदास पुरस्वानी यांनी व्यक्त केले आहे.