गीता जैन यांच्यावर अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याचा भाजपाचा खटाटोप
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2020 04:15 PM2020-03-17T16:15:24+5:302020-03-17T16:18:36+5:30
तक्रारदार नगरसेविका रुपाली मोदी यांनी आधीच पोलीसांना जबाब देत धक्काबुक्की प्रकरणी आपली कोणती तक्रार नसल्याचे स्पष्ट केले होते.
मीरारोड - गेल्या वर्षी छत्री वाटपाच्या कार्यक्रमावरुन घडलेल्या वादाचा मुद्दा उपस्थित करत महिला आमदार गीता जैन यांच्याविरोधात अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यासाठी भाजपाच्या महापौर ज्योत्सना हसनाळे, उपमहापौर हसमुख गेहलोत, भाजपा जिल्हाध्यक्ष हेमंत म्हात्रे यांच्यासह भाजपा नगरसेवक, पदाधिकारी तब्बल दोन - अडिज तास काशिमीरा पोलीस ठाण्यात ठिय्या धरला होता. भाजपा माजी आमदार नरेंद्र मेहतांवर २० वर्षां पासूनच्या तक्रारीवर अॅट्रोसिटी दाखल होते तर आमदार गीता यांच्यावर ८ महिन्यांपूर्वी झालेल्या घटने प्रकरणावर गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी भाजपा शिष्टमंडळाने केली. तर तक्रारदार नगरसेविका रुपाली मोदी यांनी आधीच पोलीसांना जबाब देत धक्काबुक्की प्रकरणी आपली कोणती तक्रार नसल्याचे स्पष्ट केले होते.
गेल्या वर्षी हाटकेश भागात महापालिकेच्या माध्यमातुन नगरससेवक निधी वापरुन भाजपा नगरसेविका रुपाली मोदी यांनी ज्येष्ठ नागरिक निवारा रस्त्याच्या मध्यभागी दुभाजकातील मोकळ्या जागेत बनवले होते. गेल्या वर्षी ६ जुलै रोजी त्या भागातील इमरान हाशमी यांनी ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटपाचा कार्यक्रम आयोजित केले होता व त्यासाठी भाजपा नगरसेविका असलेल्या गीता जैन यांना पाचारण केले होते. गीता व नरेंद्र मेहतांमधील वाद सर्वश्रुत होता तर रुपाली ह्या मेहता समर्थक मानल्या जात असल्याने रुपाली व त्यांचे पती यांनी तेथे जाऊन कार्यक्रम बंद करा म्हणुन दरडावण्यास सुरवात केली होती. तसेच छत्री ठेवलेले टेबल हटवण्याचा प्रयत्न केला असता त्यावरुन धक्काबुक्की व बोलाचाली झाल्या होत्या. त्या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. काशिमीरा पोलीसांनी त्या प्रकरणी रुपाली यांना तक्रार देण्या बाबत विचारणा केली असता त्यांनी आपणास कोणाविरुध्द तक्रार द्यायची नाही असा लेखी जबाब काशिमीरा पोलीसांना दिला होता. उपनिरीक्षक दिपक धनवटे यांनी रुपाली यांचा जबाब त्यांचे पती राजु समक्ष नोंदवून घेतला होता. तर गीता जैन यांनी देखील तक्रार दिली नव्हती.
दरम्यान सोमवारी भाजपाच्या सेव्हन सक्वेअर शाळे जवळील जिल्हा पक्ष कार्यालयात काही ठारावीक नगरसेवक, पदाधिकारी आदिंची बैठक बोलावण्यात आली होती. त्या बैठकी नंतर नगरसेविका रुपाली मोदी यांच्यासह भाजपाच्या महापौर ज्योत्सना हसनाळे, उपमहापौर हसमुख गेहलोत, भाजपा जिल्हाध्यक्ष हेमंत म्हात्रे, नगरसेवक ध्रुवकिशोर पाटील, राकेश शाह, प्रशांत दळवी, आनंद मांजरेकर, संजय थेराडे, अनिल विराणी, दिनेश जैन, नगरसेविका शानु गोहिल, अनिता मुखर्जी, विणा भोईर, हेतल परमार, सुरेखा सोनारे, माजी नगरसेवक अनिल भोसले, भगवती शर्मा, अनुसुचीत जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष संगीता धाकतोडे, सुनिल धापसे, सुनिल कांबळे, महिला जिल्हाध्यक्ष वनिता बने व अन्य पदाधिकारी - कार्यकर्ते मोठ्या संख्येने काशिमीरा पोलीस ठाण्यात जमले.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे यांच्या दालनात ठिय्या धरत ६ जुलै रोजी घडलेल्या घटनेप्रकरणी रुपाली यांच्या तक्रारी वरुन आमदार गीता जैनविरोधात अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करा अशी जोरदार मागणी केली. गुन्हा दाखल करत नाही तो पर्यंत आम्ही येथुन हटणार नाही, नरेंद्र मेहतांवर २० वर्षापूर्वी पासुनच्या प्रकरणात अॅट्रोसिटी पोलीस दाखल करत असतील तर ८ महिन्यापूर्वी घडलेल्या या वादाप्रकरणी देखील गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी चालवली. हजारे यांनी शिष्टमंडळास, रुपाली मोदी यांनी दिलेला जबाब याची माहिती देतानाच योग्य व कायदेशीर असेल त्या प्रमाणे कार्यवाही केली जाईल असे आश्वस्त केल्याचे सुत्रांनी सांगितले. तब्बल दोन अडिज तासांनी महापौरांसह नगरसेवक, पदाधिकारी आदि पोलीस ठाण्यातून बाहेर पडले.