पुन्हा केटीएसमध्ये रेमडेसिविरचा काळाबाजार; दोन इंजेक्शन जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2021 06:14 PM2021-05-06T18:14:07+5:302021-05-06T18:18:58+5:30
Black marketing of remdesivir केटीएसच्या दोन कर्मचाऱ्यांचा समावेश
गोंदिया : कोरोना रूग्णांना दिले जाणारे रेमडेसिविरचा इंजेक्शनचा काळाबाजार करताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयातील दोन कर्मचाऱ्यांना पकडले आहे. ही कारवाई ५ मे रोजी रात्रीच्या सुमारास करण्यात आली.
दोन्ही कर्मचारी ते रेमडेसिविर इंजेक्शन १८ हजार रूपये प्रतिदराने विक्री करीत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी के.टी.एस.रुग्णालयातील सफाई कामगार सागर पटले रा.मोठा रजेगाव याला इंजेक्शनची विक्री करताना रंगेहात पकडले. सागर पटले याच्याकडे ते इंजेक्शन कुठून आले यासंदर्भात विचारणा केली असता के.टी.एस. रुग्णालय गोंदिया येथे अधिपरिचारक (स्टाफ ब्रदर) म्हणून कार्यरत असलेला अशोक उत्तमराव चव्हाण रा. शास्त्री वार्ड गोंदिया याच्याकडून आणल्याचे सांगितले. अशोक उत्तमराव चव्हाण याला सापळा रचून पकडण्यात आले. त्याने त्या इंजेक्शन के.टी.एस. रुग्णालय गोंदिया येथील औषध भांडारातून आणल्याचे सांगितले. त्या दोघांकडून ताब्यातून दोन रेमडेसिविर इंजेक्शन व दोन मोबाईल असा एकुण ३२ हजाराचा माल जप्त करण्यात आला. आरोपी सागर राजेन्द्र पटले (२०) रा. मोठा रजेगांव, ता. किरणापूर, जि. बालाघाट अधिपरिचारक अशोक उत्तमराव चव्हाण या दोघांविरूध्द गोंदिया शहर पोलीस ठाण्यात भादंविच्या कलम ४२०, १८८, ३४ सह परिशिष्ट २६ औषध नियंत्रण किंमत आदेश २०१३, सहकलम ३ (क), ७ जिवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५, सहकलम १८ (क), २७ (ख),(दोन) औषधी व सौंदर्य प्रसाधन कायदा १९४० व नियम १९५४ अन्वये गुन्हा नोंद केला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, पोलीस उपनिरीक्षक तेजेंद्र मेश्राम, अभयसिंह शिंदे, पाल कापगते, लिलेन्द्रसिंह बैस, चंद्रकांत करपे, राजेंद्र मिश्रा, महेश मेहर, रेखलाल गौतम, तुलसीदास लुटे,अजय राहांगडाले, विजय मानकर,संतोष केदार, महिला पोलीस शिपाई गेडाम यांनी केली आहे.
एकाच दिवशी दोन कारवाया
जिल्ह्यात रेमडेसिविर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार सुरु आहे. रुग्णांसाठी येणारे इंजेक्शनची काळ्याबाजारात विक्री केली जात आहे. याची ओरड वाढल्यानंतर पोलिसांनी धडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बुधवारी रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या एकूण चार जणांवर कारवाई केली आहे.
कुठे गेले नोडल अधिकारी
खासगी नव्हे तर आता शासकीय रुग्णालयातील रुग्णांसाठी येणाऱ्या रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार केला जात असल्याचे पोलिसांनी बुधवारी केलेल्या कारवाईनंतर शिक्का माेर्तब झाले आहे. काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हाधिकारी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. तसेच स्वत:च्या नियंत्रणाखाली रेमडेसिविर इंजेक्शनचे वितरण सुरु ठेवले आहे. पण यानंतर या इंजेक्शनचा काळाबाजार सुरुच असल्याने नोडल अधिकाऱ्यांचे ुलक्ष नेमके कुठे असा प्रश्न निर्माण झाला आहे.