औरंगाबाद : नशेखोरांमध्ये ‘बटन’ या सांकेतिक नावाने ओळखल्या जाणाऱ्या औषधी गोळ्यांचा वापर नशेसाठी केला जात आहे. या गोळ्या खाऊन नशा करणारे प्राणघातक हल्ला आणि खून करण्यासारखा टोकाचा निर्णय घेतात. जिन्सी ठाण्याच्या हद्दीत ७ महिन्यांत ४ खून आणि प्राणघातक हल्ल्याच्या त्याहून अधिक घटना घडल्या. या घटनांनाही बटनची किनार असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.
जिन्सी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुंगी आणणाऱ्या औषधी गोळ्या नशेखोरांना विक्री करण्याचा गोरखधंदा अनेक जण करतात. औषधी गोळ्यांची बेकायदेशीर विक्री करताना गुन्हे शाखा, जिन्सी पोलीस आणि अन्न व औषधी प्रशासन विभागाने अनेकदा कारवाई केली. मात्र, पोलीस कारवाईचा कोणताही परिणाम या लोकांवर होत नाही. परिणामी, नशेखोरांना चोरट्या मार्गाने सहज औषधी गोळ्या उपलब्ध होतात. दारू, गांजा, चरस आदी प्रकारची नशा करणाऱ्या व्यक्ती नशेत असल्याचे वासामुळे सहज कळते. त्यामुळे या अमली पदार्थाऐवजी नशेखोर गोळ्यांना प्राधान्य देत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
परिणामी, नशेच्या गोळ्यांचा चोरटा व्यापार जिन्सी, सिटीचौक परिसरात मोठ्या प्रमाणात फोफावला आहे. गोळ्यांची नशा करणाऱ्याचा वास समोरच्या व्यक्तीला येत नाही. मद्यपीप्रमाणे या नशेखोरांवर पोलिसांकडून कारवाई होत नाही. यामुळे सुरक्षित नशा म्हणून नशेखोर औषधी गोळ्यांकडे वळत आहेत. पोलिसांकडून कठोर कारवाई होत नसल्याने औषधी गोळ्यांची नशा करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गोळ्यांची नशा करणाऱ्यांमध्ये जिन्सी, सिटीचौक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तरुणांची संख्या अधिक आहे. जिन्सी ठाण्याच्या हद्दीत ७ महिन्यांत ४ खून झाले. एवढेच नव्हे, तर बुधवारी रात्री हत्या झालेला तरुण आणि त्याचे साथीदारही कटकटगेट परिसरातून आले होते. तीन महिन्यांपूर्वी किराडपुरा येथे एका हॉटेलसमोर औषधी गोळ्यांच्या नशा करणाऱ्या जमील खान याने समद खान यांची धारदार कैचीने हत्या केली होती. याशिवाय औषधी गोळ्यांच्या अमलाखाली असलेले तरुण अधिक क्रूर होतात आणि सतत धारदार शस्त्र जवळ बाळगतात. असे तरुण खून आणि खुनाचा प्रयत्न सहज करतात. जिन्सी परिसरात वाढलेल्या अशा घटनांना नशेच्या गोळ्याच कारणीभूत असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.