नागपूरच्या जरीपटक्यातील खोदकामात हाडेच हाडे  : नागरिकांसह पोलिसही हादरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2020 08:16 PM2020-03-09T20:16:17+5:302020-03-09T20:17:26+5:30

जरीपटक्यात रविवारी निर्माणाधीन इमारतीजवळ खोदकाम करताना दोन मानवी सांगाडे आढळले होते तर त्याच ठिकाणी सोमवारी पोलिसांना मोठ्या प्रमाणात हाडे आणि कपडे सापडल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.

Bones found in excavation work at Jaripatka in Nagpur | नागपूरच्या जरीपटक्यातील खोदकामात हाडेच हाडे  : नागरिकांसह पोलिसही हादरले

नागपूरच्या जरीपटक्यातील खोदकामात हाडेच हाडे  : नागरिकांसह पोलिसही हादरले

googlenewsNext
ठळक मुद्देतर्कवितर्क, उलटसुलट चर्चेला उधाण

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जरीपटक्यात रविवारी निर्माणाधीन इमारतीजवळ खोदकाम करताना दोन मानवी सांगाडे आढळले होते तर त्याच ठिकाणी सोमवारी पोलिसांना मोठ्या प्रमाणात हाडे आणि कपडे सापडल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.
जरीपटका पोलीस ठाण्याजवळ बापुना बार आहे. या बारजवळ किशन शावरदास सहजवानी यांनी या इमारतीच्या मागच्या बाजूला रविवारी खोदकाम सुरू केले होते. दुपारी १ ते २ च्या दरम्यान तेथे खोदकाम करणाऱ्या मजुरांना मानवी सांगाडा दिसला. नंतर पुन्हा खोदकाम केले असता पुन्हा एक कवटी अन् हाडे आढळली. त्यामुळे सर्वच हादरले. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली. पोलीस उपायुक्त नीलोत्पल यांनी सोमवारी सकाळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावून तहसीलदारांच्या उपस्थितीत खोदकाम सुरू केले. त्याठिकाणी मानवी आणि प्राण्यांची मोठ्या प्रमाणात हाडे सापडली. विशेष म्हणजे, मानवी हाडांसोबत कपडेही आढळल्याने पोलिसांसकट सारेच हादरले आहे. हा नेमका काय प्रकार आहे, त्याबाबत उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. सोमवारी सकाळपासूनच खोदकाम करण्याच्या ठिकाणी बघ्यांची प्रचंड गर्दी होती. प्रत्येक जण आपापल्यापरीने तर्क लावत होता. आरोपींनी काहींची हत्या करून त्यांना तेथे पुरले असावे, असा संशय अनेक जण व्यक्त करीत होते. यासंबंधाने परिमंडळ - ५ चे उपायुक्त नीलोत्पल यांनी लोकमतला सांगितले की, संबंधित प्रकार नेमका काय, त्याबाबत काही निष्कर्ष काढणे तूर्त शक्य नाही. बुधवारी या ठिकाणी पुन्हा इमारतीचे खोदकाम केले जाईल. त्यातून आणखी काय मिळते, रासायनिक विश्लेषकांकडून त्याबाबत काय अहवाल येतो, ते आम्ही बघणार आहोत. त्यानुसार पुढच्या कारवाईची रूपरेषा ठरवू, असे ते म्हणाले.

विविध तपास पथके कामी लागली 
खोदकामात हाडेच हाडे सापडत असल्याने तहसीलदार, पोलीस अन् नागरिक असे सारेच अचंबित झाले आहे. सकाळपासून सायंकाळपर्यंत पोलीस उपायुक्त निलोत्पल तसेच जरीपटका पोलिसांचा ताफा घटनास्थळी लक्ष ठेवून होते. आजुबाजुच्यालाही विचारणा केली जात होती. सायंकाळी गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त गजानन शिवलिंग राजमाने हे जरीपटका ठाण्यात पोहचले. त्यांनी दिवसभरापासूनच्या घटनाक्रमाची माहिती जाणून घेतली. त्यानंतर आवश्यक निर्देश दिले. या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी जरीपटका पोलीस तसेच गुन्हे शाखेची विविध पथके कामी लागले आहेत. 

Web Title: Bones found in excavation work at Jaripatka in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.