मोबाईलचा वाद गेला विकोपाला; बोरिवलीत झाली होती हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2018 09:03 PM2018-08-03T21:03:50+5:302018-08-03T21:04:37+5:30
पूर्ववैमन्यस्यातून हत्या; आरोपी शेतियारला गुन्हे शाखेच्या कक्ष - ११ केले अटक
मुंबई - बोरिवलीत पूर्ववैमन्यस्यातून अंबादास उर्फ अंबु लक्ष्मण शिंदे (वय - २९) यांची त्याच्या तीन साथीदारांनी ३० जुलैला हत्या केली होती. या प्रकरणी बोरिवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्हे शाखेच्या कक्ष - ११ ने शेतियार या आरोपीला अटक केली आहे.
बोरिवलीच्या शिंपोली येथील शिवाजी नगर झोपडपट्टीत शिंदे हा रहात असून तो रिक्षा ड्राईव्हर आहे. मात्र, अनेक सराईत गुन्ह्यातही त्याचा हात असल्याने पोलिसांनी त्याला पूर्वी तडीपार केले होते. कालांतराने शिंदे पुन्हा परिसरात रिक्षा चालवू लागला होता. त्याच परिसरात राहणाऱ्या रिक्षा चालकांची बोरिवलीत युनियन आहे. या युनियनतर्फे काही दिवसांपूर्वी पूजा आणि कार्यक्रम भरवण्यात आले होते. दरम्यान, अंबादासने आरोपींकडे पैशांची व मोबाईलची मागणी केली होती. आरोपींनी त्यास पैसे न दिल्याने मयत अंबादासने आरोपींना मारहाण केली होती. या मारहाणीचा राग मनात ठेवून ३० जुलैला शेतियार आणि त्याच्या साथीदारांनी हत्याराने वार करून आणि डोक्यात दगड टाकून त्याची जागेवरच निघृण हत्या केली होती. हत्येनंतर ते सर्व फरार झाले होते. मात्र दहिसर चेकनाका येथे आरोपी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. याठिकाणी ३१ जुलैपासून सतत पाळत ठेवून पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत तर इतर साथीदारांचा शोध सुरु आहे.