मुंबई - मुंबई विमानतळावर ड्रग्जची तस्करी करणाऱ्या ब्राझीलच्या नागरिकाला हवाई गुप्तचार विभागाने अटक केली आहे. रॉड्रिगो डोस सँटोस अल्वेस असं या आरोपीचं नाव आहे. पोलिसांनी त्याच्याजवळून ४ किलो कोकेन हस्तगत केले असून त्याची बाजारात किंमत २० कोटी रुपये आहे.
रॉड्रिगो हा इथोपियन एअरलाईन्सने सोमवारी मुंबई विमानतळावर दाखल झाला होता. तो आंतरराष्ट्रीय तस्कर असल्याची माहिती हवाई गुप्तचर पथकाला (एआययू) मिळाल्यानंतर त्याला पकडण्यासाठी सापळा रचला. विमानतळ परिसरात राॅड्रिगो आल्यानंतर एआययूच्या अधिकाऱ्यांनी त्याच्या बॅगेची झडती घेतली. मात्र, बॅगेत काही आढळून आले नाही. शेवटी त्यांच्या टी शर्टच्या आत दोन पाकिटांमध्ये पांढऱ्या रंगाची पावडर सापडली. प्राथमिक तपासणीत ते कोकेन असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याच्याकडून चार किलो कोकेन हस्तगत करण्यात आले. हे कोकेन दक्षिण अमेरिकेतून आणण्यात आले असल्याची कबुली त्याने दिली आहे. या कामासाठी त्याला तीन हजार अमेरिकन डॉलर मिळणार होते. त्याला ब्राझीलमध्ये हे ड्रग्स देण्यात आले होते. तेथील साओ पावलो विमानतळावरून इथोपियातील अदी अबाबा विमानतळावर तो गेला आणि तेथून मुंबईला येण्यासाठी तो विमानात बसला.
पाच दिवासांपूर्वीच मुंबई विमातळावरून दोन महिलांकडून १५ कोटी रुपयांचे कोकेन हस्तगत केले होते. हे ड्रग्ज त्या दोघींनी कॅप्सूलमध्ये भरून पोटात गिळून आणले होते. अटक आरोपींमध्ये एक ब्राझील व एक व्हेनेझुएला येथील नागरीक असलेल्या महिलांचा समावेश होता. मागील पाच दिवसात एआययूने विमानतळावरून ४० कोटींपेक्षा अधिक रक्कमेचे कोकेन हस्तगत करण्यात आले आहेत.