Breaking : कंगनाविरोधात गुन्हा दाखल, धार्मिक तेढ अन् उद्धव सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न
By पूनम अपराज | Published: October 17, 2020 07:32 PM2020-10-17T19:32:45+5:302020-10-17T19:34:15+5:30
FIR on Kangana Ranaut : हा एफआयआर भादंवि कलम २९५(अ), १५३(अ) आणि १२४(अ) अंतर्गत दाखल करण्यात आला आहे.
सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणी कंगना राणौतने धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाप्रकरणी वांद्रे कोर्टाने कंगना विरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले होते. मुंबई पोलिसांना हे आदेश दिले होते. त्यानुसार बॉलिवूड अभिनेत्री कंगना आणि तिची बहीण रंगोली चंदेल यांच्याविरूद्ध वांद्रे पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. हा एफआयआर भादंवि कलम २९५(अ), १५३(अ) आणि १२४(अ) अंतर्गत दाखल करण्यात आला आहे. कास्टिंग डायरेक्टर साहिल अशरफ सय्यद यांच्या तक्रारीनंतर वांद्रे न्यायालयाने कंगना आणि तिच्या बहिणीविरूद्ध एफआयआर नोंदविण्याचे आदेश दिले होते.
हे सर्व कलम अजामीनपात्र आहेत, असे साहिलचे वकील रवीश जमींदार यांनी सांगितले. आज कोर्टाकडून आदेश मिळाल्यानंतर फिर्यादी व त्याचा वकील कोर्टाच्या आदेशाची प्रत घेऊन वांद्रे पोलिस ठाण्यात पोहोचले. एफआयआरनुसार कंगना आणि तिची बहीण रंगोली चंदेल यांनी आपल्या ट्वीटद्वारे जातीय सलोखा बिघडविण्याची आणि महाराष्ट्र सरकारच्या नावाची बदनामी करण्याचे काम केले आहे.
पोलिस या प्रकरणात प्रथम कॉपीची प्रत वाचतील आणि त्यानंतर या प्रकरणात पुरावे एकत्रित करण्याचा प्रयत्न करतील. या प्रकरणाचा सखोल चौकशी करण्याचा पोलिस प्रयत्न करतील आणि जेव्हा आवश्यक असेल तेव्हा त्यांना या प्रकरणात कंगनालाही बोलावून घेता येईल. कोर्टात दाखल केलेल्या याचिकेत असे म्हटले होते की, कंगना सतत बॉलिवूडची बदनामी करण्याचा प्रयत्न करीत आहेत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मपासून टीव्हीपर्यंत सर्वत्र ती बॉलिवूडच्या विरोधात बोलत आहे.
मोहम्मह अश्रफुल्ला सय्यद नावाच्या व्यक्तीने वांद्रे सत्र न्यायालयात तक्रार केली होती. सुशांत सिंह राजपूत प्रकरणावरून अभिनेत्री कंगना राणौतने बॉलिवूड आणि एका समाजाविरोधात वक्तव्ये केली होती. तसेच सोशल मीडियावर अनेक पोस्ट करत धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला, अशी तक्रार केली होती. तसेच कंगनाचे ट्वीट, व्हिडीओ या व्यक्तीने न्य़ायालयात सादर केले होते. न्यायालयाने आज कंगनावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुंबई पोलिसांना दिले होते. आता गुन्हा दाखल झाल्याने कंगनाच्या अडचणीत वाढ झाली आहे.