Breaking : शिवसेना आमदार प्रदीप जैस्वाल यांना सहा महिन्यांची शिक्षा आणि दंड
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2021 03:25 PM2021-05-31T15:25:28+5:302021-05-31T15:35:38+5:30
Shiv Sena MLA Pradip Jaiswal Convicted : २०१८ मध्ये क्रांती चौक पोलीस ठाण्यात रात्री जाऊन त्यांनी ठाणे अंमलदारासमोरची काच फोडली होती, खुर्ची फेकली होती.
औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार प्रदीप जैस्वाल यांना सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी सहा महिन्यांची शिक्षा व दंड ५००० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. सरकारी मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक कायदा कलम -३ भादंवि कलम ३५३,३३२, ५०४, ५०६, ४५७ अन्वये ही कारवाई करण्यात आली होती. सरकारी अभियोक्ता म्हणून ए. एस. देशपांडे यांनी कामकाज पाहिले. कलम ३५३ नुसार ६ महिने कारावास आणि २५०० रुपये दंड, अथवा दंड न भरल्यास एक महिना शिक्षा ठोठावण्यात आली आहे. कलम ५०६ अन्वये ६ महिने कारावास व २५०० रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक महिना शिक्षा सुनावली आहे.
२०१८ मध्ये क्रांती चौक पोलीस ठाण्यात रात्री जाऊन त्यांनी ठाणे अंमलदारासमोरची काच फोडली होती, खुर्ची फेकली होती. या प्रकरणात त्यांना तीन दिवस न्यायालयीन कोठडीही सुनावण्यात आली होती. पोलीस उपनिरीक्षक अजय सुर्यवंशी यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
काय आहे प्रकरण
११ आणि १२ मे २०१८ रोजी औरंगाबादमध्ये झालेल्या दंगलीप्रकरणी क्रांतीचौक पोलिसांनी गांधीनगर येथील दोन तरुणांना अटक केली. याविषयी माहिती मिळताच रविवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास आ. प्रदीप जैस्वाल हे क्रांतीचौक पोलीस ठाण्यात गेले. यावेळी ठाणे अंमलदार म्हणून पोलीस हेड कॉन्स्टेबल चंद्रकांत पोटे खुर्चीवर बसलेले होते. यावेळी ते गांधीनगर येथील आरोपींना जामिनावर सोडा, असे म्हणाले. आरोपींना अटक करणारे सहायक पोलीस निरीक्षक शेख अकमल आहेत. त्यांना याबाबत माहिती देऊन बोलावून घेतो, असे पोलीस हेड कॉन्स्टेबल पोटे यांनी सांगितले.
सहाय्यक पोलीस निरीक्षक शेख हे लगेच ठाण्यात आले आणि त्यांनी जैस्वाल यांना सांगितले की, गांधीनगर येथूनच दंगलीला सुरुवात झाली आहे, या गुन्ह्याचा तपास करायचा आहे. काही वेळानंतर जैस्वाल यांनी ठाणे अंमलदार पोटे यांना तुम्ही तुमचे काम बंद करा, आताच्या आता तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलवा, तुम्ही पोलीसवाले शिवसेनेच्याच कार्यकर्त्यांना अटक करीत आहेत. तुम्ही व तुमचे वरिष्ठ अधिकारी आमच्या पक्षालाच त्रास देत आहेत, असे म्हणून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना त्यांनी शिवीगाळ केली. उद्या शहरामध्ये काय घडते ते बघा, अशी धमकी दिली. त्याचवेळी त्यांनी पेन स्टॅण्डने टेबलावरील काच फोडली. यावेळी त्यांच्यासोबत आठ ते दहा कार्यकर्त्यांनी आणि सहायक निरीक्षक विजय घेरडे यांनी जैस्वाल यांना समजावून सांगितले. त्यानंतर कार्यकर्ते त्यांना घरी घेऊन गेले. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठांच्या आदेशाने पोलीस हेड कॉन्स्टेबल पोटे यांनी जैस्वालविरोधात सरकारी कामात अडथळा आणणे, सरकारी कर्मचाºयांना धमकावणे आणि अन्य कलमांनुसार गुन्हा नोंदविला.