बॅँकेत भरायला लावली लाचेची रक्कम : लोहमार्ग पोलीस उपनिरीक्षक जाळ्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2018 09:05 PM2018-10-24T21:05:16+5:302018-10-24T21:06:48+5:30
राज्यातील अशा प्रकारे लाच स्वीकारण्याची ही पहिलीच घटना असून लाच लुचपत प्रतिबंधक पथकाने केलेली अशी पहिलीच कारवाई आहे़.
पुणे : निनावी तक्रार अर्जाचा तक्रारदाराच्या बाजूने रिपोर्ट पाठविण्यासाठी १० हजार रुपयांच्या लाचेची रक्कम हवालदाराच्या बँक खात्यात भरायला लावून ती स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने लोहमार्ग पोलीस मुख्यालयातील पोलीस उपनिरीक्षकाला रंगेहाथ पकडले़. राज्यातील अशा प्रकारे लाच स्वीकारण्याची ही पहिलीच घटना असून लाच लुचपत प्रतिबंधक पथकाने केलेली अशी पहिलीच कारवाई आहे़.
ज्ञानदेव सोपान बारबोले (वय ५२, रा़ राखीव पोलीस उपनिरीक्षक, लोहमार्ग पोलीस मुख्यालय, खडकी) असे त्याचे नाव आहे़. याबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सांगितले की, तक्रारदार हे टेलरिंगचे काम करतात़ .त्यांच्याविरुद्ध निनावी तक्रार अर्ज मिळाला होता़. त्या अर्जाची चौकशी उपनिरीक्षक बारबोले यांच्याकडे होती़. या अर्जाची चौकशी करु तक्रारदार यांच्या बाजूने सकारात्मक अहवाल वरिष्ठांना पाठविण्यासाठी बारबोले यांनी तक्रारदार यांच्याकडे १० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली़. त्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिली़. या तक्रारीची पडताळणी केल्यावर बारबोले यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले़. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला व पोलीस उपनिरीक्षकाला पकडले़.
असा रचला सापळा
तक्रारदार हे पोलीस उपनिरीक्षक बारबोले यांना १० हजार रुपये देण्यासाठी गेले असताना बारबोले यांनी ही रक्कम पोलीस हवालदार काझी यांच्या बँक खात्यात भरायला सांगितले़. तेव्हा त्यांनी बँक खात्यात का असे विचारल्यावर ते खडकी येथील बँकेच्या शाखेत तक्रारदार यांना घेऊन गेले़. त्यांनी पैसे भरायची स्लिप घेतली व कॅशियरकडे पैसे दिले़. कॅशियरने पैसे घेऊन स्लिपवर शिक्का मारुन त्या स्लिपची ग्राहकाकडील पावती बारबोले यांच्याकडे दिली़. त्यांनी ती स्वत: कडे घेतल्याबरोबर तेथे उपस्थित असलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी बारबोले यांना रंगेहाथ पकडले़. आता या प्रकरणात हवालदार काझी यांना त्याची माहिती आहे का़, त्यांच्या बँक खात्यात पैसे भरण्यासाठी बारबोले यांना तो बँक खाते क्रमांक त्यांनीच दिला का याची चौकशी करण्यात येऊन त्यात त्यांचा सहभाग आढळल्यास त्यांच्यावरही कारवाई करण्यात येणार असल्याचे सहायक पोलीस आयुक्त सुहास नाडगौडा यांनी सांगितले़.
शासकीय लोकसेवकांनी लाचेची मागणी केल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांनी केले आहे़.