सूर्यकांत वाघमारे
नवी मुंबई - बांधकाम व्यवसायीकाची गोळी घालून हत्या झाल्याची घटना गुरुवारी दुपारी तळवली येथे घडली. यामध्ये इतर एकजण जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. भरदिवसा घडलेल्या या थरारक हत्याकांड मागे व्यवसायीक वादाचे कारण समोर येत आहे.प्रवीण तायडे असे गोळी लागून मयत झालेल्या बांधकाम व्यावसायिकाचे नाव आहे. घणसोली सेक्टर 21 (तळवली) येथे त्याचे बांधकाम सुरु आहे. मुख्य व्यवसायिकांकडून काम घेऊन तो बांधकाम करायचा. दरम्यान बांधकामाची साईट मिळवण्यावरून त्याची काही स्थानिक बांधकाम व्यवसायिकांमध्ये चढाओढ असायची. याच प्रकारातून घणसोली सेक्टर 21 मधीलच काही भूखंड विकसित करण्याचे काम मिळ्वण्यावरून देखील तायडे याचे काहीजणांसोबत वाद सुरु होते असे समजते. याच वादातून गुरुवारी संधी साधून त्याची हत्या झाल्याची शक्यता आहे.गुरुवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास प्रवीण तायडे हा एका साथीदारासोबत मोटारसायकलवरून चालला होता. यावेळी पाठीमागून आलेल्या अज्ञात वाहनाने त्याच्या मोटरसायकलला जोराची धडक मारली. त्यानंतर मारेकरुंपैकी एकाने तायडेवर गोळ्या झाडल्या. त्यामध्ये एक गोळी तायडेच्या डोक्यात लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर त्याच्या साथीदारालाही गोळी लागली असून तो जखमी अवस्थेत पडला असता हल्लेखोरांनी तिथून पळ काढला. या घटनेनंतर परिसरातील व्यक्तींनी पोलिसांना कळवले असता गुन्हे शाखा उपायुक्त प्रवीणकुमार पाटील, परिमंडळ उपायुक्त पंकज डहाणे यांनी तपास पथकांसह घटनास्थळी भेट दिली.गुन्हा उघडकीस आणण्यासाठी गुन्हे शाखा व परिमंडळ पोलिसांची पथके तयार करण्यात आली आहेत. तर हत्येमागच्या कारणांचा शोध घेण्यासाठी तायडेच्या संपर्कातील व्यक्तींकडेही पोलीस चौकशी करत आहेत. दरम्यान जुन्या काही गुन्हेगारी प्रकरणात तो साक्षीदार होता असेही समजते. यामुळे जुन्या कोणत्या वादातून त्याची हत्या झाली आहे का याचाही तपास पोलीस करत आहेत.
विजय मल्ल्या प्रत्यार्पणाची निव्वळ अफवा? लवकरच भारतात आणण्याचे वृत्त ईडीने फेटाळली
धक्कादायक! ठाण्यात लग्नाचे अमिष दाखवून मेैत्रिणीवर लैंगिक अत्याचार