उद्याेजक भरतीया यांच्या बंगल्यात घरफोडी: आरोपी परजिल्ह्यातील, ४८ तासांत आवळल्या मुसक्या
By आशीष गावंडे | Published: May 6, 2024 10:59 PM2024-05-06T22:59:18+5:302024-05-06T22:59:39+5:30
घरफाेडीत अट्टल गुन्हेगारांचा समावेश
आशिष गावंडे, अकोला: शहरातील सहकार नगरमधील रहिवाशी उद्याेजक ब्रिजमाेहन भरतीया यांच्या बंगल्यातून सोन्या चांदीचे दागिने व रोख रकमेसह ४४ लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास करणाऱ्या आराेपीच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. याप्रकरणी पाेलिसांनी तपासाची सुत्रे वेगाने फिरवीत अवघ्या ४८ तासांत अहमदनगर जिल्ह्यातून आराेपी जिगर कमलाकर पिंपळे (३७)रा. पाखोरा, ता. गंगापुर, जि. छत्रपती संभाजीनगर याला साेमवारी अटक केली. आराेपीने घरफाेडीची कबुली दिली असून इतर फरार आराेपींचा कसून शाेध घेतला जात असल्याची माहिती आहे.
शहरातील सहकार नगर मधील रहिवाशी ब्रिजमाेहन भरतीया यांच्या बंगल्यात शिरून चोरट्यांनी घरातील सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कमेवर ताव मारुन लंपास झाल्याची घटना ३ मे राेजी मध्यरात्री घडली हाेती. हा प्रकार ४ मे राेजी कुटुंबीयांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी खदान पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नाेंदवली हाेती. या प्रकरणी अज्ञात आराेपींविराेधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला हाेता. दरम्यान, या घटनेची गंभीर दखल घेत जिल्हा पोलिस अधीक्षक बच्चन सिंह यांनी भरतिया यांच्या बंगल्याची पाहणी करीत पाेलिसांना सूचना केल्या हाेत्या. स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख शंकर शेळके, ‘पीएसआय’ आशिष शिंदे व पथकातील पोलिसांनी घटनास्थळाची कसून पाहणी केल्यानंतर आराेपीच्या शाेधासाठी यंत्रणा कामाला लावली हाेती.
घरफाेडीत अट्टल गुन्हेगारांचा समावेश
स्थानिक गुन्हे शाखेने आराेपी जिगर पिंपळे याला अहमदनगर जिल्हयातून शिताफीने अटक केली. आराेपीने गुन्ह्याची कबुली दिली असून इतर आराेपींनी चाेरी केलेले दागिने व काही रकमेची आपसात हिस्सेवाटणी केली. घरफाेडी केल्यानंतर आराेपी वेगवेगळया मार्गाने निघून गेल्याचे आरोपीने सांगितले. यामध्ये अट्टल गुन्हेगारांचा समावेश असल्याची माहिती आहे.