सफाई कामगारच करायचा घरफोड्या,साडेचौदा लाखांचे दागिने जप्त, काशिमीरा पोलिसांची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2022 07:06 AM2022-06-08T07:06:48+5:302022-06-08T07:07:27+5:30
crime news : सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. रवी आबा कांबळे (२९) असे आरोपीचे नाव आहे. तो सफाई कामगार आहे. ज्या वसाहतीत काम करायचा तेथेच त्याने २ घरफोड्या केल्या आहेत.
मीरा रोड : काशिमीरा पोलिसांनी घरफोड्या करणाऱ्यास अटक केली आहे. त्याने परिसरात ४ घरफोडीचे गुन्हे केल्याचे उघडकीस आले
आहे. पोलिसांनी त्याच्या कडून १४ लाख ६७ हजार किमतीचे
सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. रवी आबा कांबळे (२९) असे आरोपीचे नाव आहे. तो सफाई कामगार आहे. ज्या वसाहतीत काम करायचा तेथेच त्याने २ घरफोड्या केल्या आहेत.
याप्रकरणी सहायक आयुक्त विलास सानप व वरिष्ठ निरीक्षक संजय हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे निरीक्षक विजय पवार, सहायक निरीक्षक प्रशांत
गांगुर्डे सह गणेश कोळी, विश्वनाथ जरग, नीलेश शिंदे, स्वप्नील
मोहीले, सतीश निकम, जयकुमार राठोड यांच्या पथकाने
घरफोड्यांचा तपास सुरू केला. घटनास्थळावरुन प्राप्त माहिती व चौकशीच्या आधारे पोलिसांनी संशयित घरफोड्या हा जनता नगर झोपडपट्टीतील जय अंबे चाळीत राहत असल्याचे समजले.
पोलिसांनी रवी कांबळेला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने माझगावकर यांच्या घरी तसेच जे. पी. नॉर्थ वसाहतीत ३ घरफोड्या केल्याचे उघडकीस आले. त्याच्या
पँटच्या खिशामध्ये २ सोन्याच्या बांगड्या व १ सोन्याचे
मंगळसूत्र सापडले. कांबळे हा
जे. पी. नॉर्थ वसाहतीत
सफाई कामगार म्हणून काम करायचा. त्यामुळे घरात शिरण्यासाठी जागा हेरून पाळत ठेऊन घरफोड्या करायचा. त्याच्याकडून २९३.५ ग्रॅम वजनाचे १४ लाख ६७ हजार ५०० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले आहेत.
भर दिवसा झालेल्या चोरीने उडाली खळबळ
काशीमीरा पोलीस ठाणे हद्दीत मीरारोडच्या विनय नगर भागात राहणाऱ्या सबीना शौकत माझगांवकर यांच्या घराच्या बाथरुमच्या खिडकीची काच तोडून अनोळखी चोरट्याने घरातील लाकडी कपाटात ठेवलेले ८ लाख २१ हजारांची दागिने चोरून नेले होते. याप्रकरणी २ जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. दिवस ढवळ्या झालेल्या ह्या घरफोडीने परिसरात खळबळ उडाली होती.