लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : हिंगणघाट येथील भरचौकात पेट्रोल टाकून जाळलेल्या तरुणीची मृत्यूशी झुंज सुरू आहे. डॉक्टरांनुसार तरुणी ३५ ते ४० टक्के जळाली असून तोंडात पेट्रोल टाकून जाळल्याने अंतर्गत अवयव भाजले गेले आहेत. विशेषत: श्वासनलिका जळाल्याने तिला श्वास घेणे कठीण जात असल्याने कृत्रिम श्वासावर ठेवण्यात आले आहे. पुढील ४२ तास तिच्यासाठी महत्त्वाचे असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.सोमवारी सकाळी घडलेल्या या घटनेनंतर हिंगणघाट प्राथमिक आरोग्य केंद्रात तिच्यावर उपचार करण्यात आले. परंतु प्रकृती गंभीर होत असल्याचे पाहता हिंगघाट पोलिसांनी सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास नागपूरच्या ऑरेंज सिटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. नुरुल अमीन, एन्टेन्सिव्हिस्ट तज्ज्ञ डॉ. शीतल चौहान यांच्या देखरेखीखाली कॅज्युअल्टी मेडिकल ऑफिसर डॉ. दीपक कोरे जळीत तज्ज्ञ व प्लास्टिक सर्जन डॉ दर्शन रेवानवार यांनी तातडीने उपचाराला सुरुवात केली.हॉस्पिटलचे संचालक डॉ. अनुप मरार यांनी ‘लोकमत’ला सांगितले, पुढील ४२ तास त्या तरुणीसाठी महत्त्वाचे आहेत. अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. तिचा चेहरा, मान, डोक्याचा भाग, डावा हात, छाती जळालेली आहे. तिच्या डोळ्यांवरही भाजल्याच्या जखमा आहेत. श्वसननलिका जळाल्याने कृत्रिम श्वासोच्छवास दिला जात आहे. तिचा आवाज, दृष्टी जाईल का, हे अद्याप अधिकृतरीत्या सांगता येणार नाही, असेही ते म्हणाले. सोमवारी पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार, आ. समीर कुन्नावार यांनी रुग्णालयाला भेट दिली. तिच्या प्रकृतीकडे डॉ. रेवानवार यांच्यासह क्रिटीकल केअर डॉ. राजेश अटल, फिजिशियन डॉ. सिद्धार्थ सावजी, ईएनटी सर्जन डॉ. अभय आगाशे, नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. निनाद गावंडे आदी लक्ष ठेवून आहेत.
जळालेली तरुणी कृत्रिम श्वासावर : मृत्यूशी झुंज सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 04, 2020 8:23 PM
हिंगणघाट येथील भरचौकात पेट्रोल टाकून जाळलेल्या तरुणीची मृत्यूशी झुंज सुरू आहे. डॉक्टरांनुसार तरुणी ३५ ते ४० टक्के जळाली असून तोंडात पेट्रोल टाकून जाळल्याने अंतर्गत अवयव भाजले गेले आहेत.
ठळक मुद्देनागपूरच्या खासगी इस्पितळात उपचार