खोट्या प्रेमाचा धंदा कापतोय ११ अब्ज रुपयांचा खिसा; काय आहे घोटाळा? 'अशी' होते फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2024 09:03 AM2024-11-29T09:03:08+5:302024-11-29T09:03:37+5:30
मेंदूला इजा झालेली व्यक्ती खोट्या प्रेमाची शिकार, खोट्या प्रेमाच्या जाळ्यात अडकविल्यानंतर एक किंवा अनेक लोक फसवणूक झालेल्या व्यक्तीचे शोषण करतात
मेलबर्न : फसवणूक करणारे इतरांची आर्थिक लुबाडणूक करण्यासाठी विविध मार्गांचा अवलंब करतात. एखाद्याची फसवणूक करण्यासाठी खोट्या प्रेमाच्या जाळ्यात ओढणे किंवा खोट्या रोमान्सचा आधार घेण्याचे प्रमाण हल्ली जास्त वाढले आहे. मेंदूला इजा झालेले लोक अशा प्रकारच्या खोट्या प्रेमाची शिकार होण्याचा धोका अधिक असल्याचे ऑस्ट्रेलियातील एका विद्यापीठात केलेल्या अभ्यासातून स्पष्ट झाले आहे.
रोमान्स घोटाळ्यातून आर्थिक नुकसानीपेक्षा व्यक्तीच्या मानसिकतेवर विपरीत परिणाम झाल्याची बाब या अभ्यासातून समोर आली आहे. खोट्या प्रेमात फसवणूक झालेल्या लोकांना स्वत:ची लाज वाटते. आपले नाते वास्तविक नव्हते, यावर विश्वास ठेवण्यास त्यांचे मन तयार होत नाही. या घोटाळ्यांबद्दल फारशी माहिती नसल्याने त्यांची केवळ फसवणूकच होत नाहीतर भावनिक घुसमट होत असल्याची माहिती अभ्यासातून समोर आली आहे.
रोमान्स घोटाळा
या अभ्यासासाठी मेंदूला इजा झालेल्या रुग्णांवर उपचार करणाऱ्या ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडच्या १०१ डॉक्टरांचे सर्वेक्षण करण्यात आले. ५३ टक्के डॉक्टरांकडे उपचार घेणारे रुग्ण सायबर घोटाळ्याचे शिकार झाले असून, यात रोमान्स घोटाळ्यामुळे आर्थिक लुबाडणूक झालेल्यांची संख्या सर्वाधिक आहे.
काय आहे घोटाळा?
खोट्या प्रेमाच्या जाळ्यात अडकविल्यानंतर एक किंवा अनेक लोक फसवणूक झालेल्या व्यक्तीचे शोषण करतात. आर्थिक लुबाडणूक हा त्यांचा मुख्य उद्देश असतो. त्यासाठी ऑनलाइन डेटिंग प्लेटफॅार्म, सोशल मीडिया, गेमिंग ॲप किंवा ऑनलाइन शॉपिंगच्या वेबसाइटचा आधार घेतला जातो.
अशी होते फसवणूक
फसणूक करणारे लोक दुसऱ्यांना आकर्षित करण्यासाठी खोट्या गोष्टींचा आधार घेतात. यात श्रीमंत होण्यासाठी उपाय सांगणे; स्वत: विधुर किंवा अनाथ असल्याचे सांगणे. हे लोक समोरच्या व्यक्तीची खोटी प्रशंसादेखील करतात. ११ अब्ज रुपयाचे नुकसान ऑस्ट्रेलियात खोट्या प्रेमाच्या गोरखधंद्यामुळे सामान्य लोकांचे झाले आहे.