मुंबई - गुजरातमध्ये राहणाऱ्या राजेश उर्फ राजूभाई गमलेवाला या म्होरक्यासह अन्य तिघांना वर्सोवा पोलिसांनी ३०० मुलांची तस्करी करताना बेड्या ठोकल्या आहे. एका मुलाची किंमत ४५ लाख असून त्यांना अमेरिकेत पाठवण्याच्या तयारीत असताना एका जागरूक अभिनेत्रीमुळे हे प्रकरण उघड झाले आहे. निवृत्त पोलीस उपनिरीक्षकाचा मुलगा अमीर खान (वय - २६), ताजुद्दीन खान (वय - ४८), अफजल शेख (वय - ३५) आणि रिझवान छोटानी (वय -३९) या अन्य तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. अभिनेत्री प्रिती सूद हिच्या सतर्कतेमुळे एक आंतराष्ट्रीय तस्करीचे रॅकेट उघडकीस आले आहे.
मुख्य आरोपी गमलेवाला याला वर्सोवा पोलिसांनी अहमदाबादहून अटक केली असून तस्करी होणार्या मुलांचे साधारण वय ११ ते १६ दरम्यान आहे. ही मुलं गरीब घरातील आहेत आणि त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न मोठा होता. नेमकी ही गोष्ट हेरून गमलेवाला मुलांच्या पालकांकडून त्यांना विकत घेत असे. अशीच मुलं शोधावी असे अमेरिकेच्या ग्राहकांकडून त्याला सांगण्यात आले होते. गमलेवाल्याने त्यासाठी एक पथकही बनवले होते. गरीब व गरजू लोकांना हेरून तो मुले विकत घेत असे. मुलांना विकण्यापूर्वी त्यांचा मेक अप करून त्यांचा मेक ओव्हर करण्यात येई, जेणेकरून ते सुंदर दिसतील. मेकअप करून त्यांचे फोटो काढले जात असत आणि त्याच फोटोचा वापर करून पासपोर्टही बनवले जात अशी माहिती वर्सोवा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय पवार यांनी दिली. याप्रकरणी बोगस पासपोर्ट बनविल्याचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. महत्वाचे म्हणजे प्रिती सूद ही अभिनेत्री मार्चमध्ये वर्सोवामध्ये गेली होती. तेव्हा तिला एका सलूनमध्ये काही लोक अल्पवयीन मुलींना मेकअप करताना दिसली. एवढा मेकअप करण्याचे कारण तिने विचारले असता, या मुलींना अमेरिकेत त्यांच्या पालकांकडे अमेरिकेत पाठवण्याचे कारण त्यांनी दिले. सूद यांनी त्यांना पोलिसांकडे जाण्यास सांगितले, त्यावर त्यांनी नकार दिला. सूद यांनी पोलिसांना बोलावले तेव्हा तिघांपैकी एकाने पळ काढला. या मुली गुजरातच्या मेहसाणा जिल्ह्यातल्या होत्या. सलूनमध्ये काही अल्पवयीन मुली आल्याची माहिती सूद यांच्या मैत्रिणींनी कळवली. या मुलींना देहविक्रीसाठी तयार करण्यात येणार असल्याचा संशय सूद यांना आला आणि हे रॅकेट मोठे असल्याचा त्यांच्या लक्षात आले. या प्रकरणी वर्सोवा पोलिसांनी चौघांना अटक केली. धक्कादायक बाब म्हणजे अटक झालेल्यांपैकी एक निवृत्त पोलीस उप निरीक्षकांचा मुलगा आहे. गमलेवाला आपल्या साथीदारांशी व्हॉट्स ऍपवरून संपर्कात होता. याच क्रमांकाच्या आधारावरून पोलिसांनी गमलेवालाला पकडले. गमलेवाला २००७ साली मुंबईत खोटे पासपोर्ट बनवण्याच्या आरोपाखाली अटक झाली होती. गमलेवालाला लहान मुलांची तस्करी करणे आणि त्यांन वैश्याव्यवसायासाठी प्रवृत्त करण्याच्या गुन्ह्याखाली अटक केली असून १८ ऑगस्टपर्यंत पोलीस सुनावली आहे. तर इतर चार आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी भा. दं. वि. कलम ३४ आणि ३७३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी अधिक तपास सुरु केला आहे.