इंदौर – मध्य प्रदेशातील इंदौर पलासिया पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी एक ह्दयद्रावक घटना घडली आहे. किरकोळ कारणावरून कार चालक आणि दुचाकीस्वारामध्ये धक्काबुक्की झाली, यावेळी कारचालकाला धक्का बसल्याने तो खाली पडला, दुर्दैवाने यावेळी दुसरीकडून वेगाने येणाऱ्या ट्रक चालकाने कार चालकाला चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला, घडलेला प्रकार सीसीटीव्ही कैद झाला आहे.
पलासिया ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी सकाळी ११ वाजून १४ मिनिटांनी ही घटना घडली, या घटनेचा व्हिडीओ पाहून अंगावर थरकाप उडेल. कारला दुचाकीने धडक दिल्यानंतर कार चालक सिद्धार्थ सोनी आणि दुचाकीस्वार विकास यादव यांच्यात वाद झाला, हा वाद इतक्या विकोपाला गेला की, दोघांमध्ये झटापट झाली, याचवेळी रस्त्यावरून ट्रक जात होता, झटापटीत आर्किटेक्ट सिद्धार्थ सोनी रस्त्यावर पडला आणि ट्रकने सिद्धार्थला चिरडलं, त्यात त्याचा मृत्यू झाला.
सिद्धार्थचं २ वर्षापूर्वीच लग्न झालं होतं, २६ डिसेंबर रोजी त्यांच्या लग्नाचा वाढदिवस होता, सिद्धार्थचे वडील डिटर्जेंट पावडरचा कारखाना चालवतात. घरात आई, पत्नी, लहान बहीणदेखील आहे. सिद्धार्थ आर्किटेक्ट होता आणि शहराच्या स्मार्टसिटी प्रकल्पात तो काम करत होता.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
इंदौरमध्ये गुरूवारी एका युवकाचा झटापट सुरु असताना घडलेल्या प्रकारामुळे मृत्यू झाला, काळ बनून मृत्यूने युवकावर घाला घातला, इंदौरच्या पलासियाच्या परिसरातील पत्रकार कॉलनीतील चौकात ही घटना घडली, कॅनरा बँकेच्याजवळ एक कार चालक आणि दुचाकीस्वार यांच्यात वाद झाला, त्यानंतर दोघांमध्ये वादविवाद सुरु झाला, त्यानंतर हा वाद इतका विकोपाला गेला दोघांमध्ये झटापट झाली, या धक्काबुक्कीत कार चालक रस्त्यावर पडला, तेव्हा वेगाने येणाऱ्या ट्रकने कार चालकाला चिरडले आणि त्यात त्याचा मृत्यू झाला.
पलासिया पोलिसांच्या माहितीनुसार, प्रत्यक्षदर्शींकडून आम्हाला माहिती मिळाली, प्राथमिक तपासात सिद्धार्थ सोनी त्यांच्या कारने जात होते, विकास यादव समोरून येत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. अॅक्टिव्हाला गाडी धडकल्यानंतर दोघांमध्ये वाद सुरू झाला. या वादावादीत दोघांमध्ये झटापट झाली, त्याचवेळी एक ट्रक बाजूने जात होता. या दरम्यान कार चालक सिद्धार्थ सोनी रस्त्यावर पडला आणि ट्रकचे चाक त्याच्या अंगावर चढले ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला. बिछौली गावचा रहिवाशी आरोपी विकास यादव याला या प्रकरणात गुन्हेगार म्हणून पोलिसांनी अटक केली आहे. त्याचवेळी ट्रकने उडवलेल्या ड्रायव्हरलाही पोलिसांनी पकडले आहे.
पालासिया पोलीस स्टेशनचे प्रभारी संजयसिंग बैस यांनी सांगितले की, संपूर्ण प्रकरण गुन्हेगारी मानसिकतेच्या प्रकारात मोडते, त्यामुळे ट्रक चालक आणि अॅक्टिव्हा चालक दोघांवरही कारवाई केली जाईल. आम्ही गुन्हा दाखल केला आहे, आरोपीला अटक करण्यात आली आहे, दुर्दैवी घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली होती आणि पोलीस येईपर्यंत सिद्धार्थ सोनीचा मृतदेह रस्त्यावर पडला होता आणि लोक किरकोळ कारणावरून घडलेल्या दुर्दैवी प्रकारावर शोक व्यक्त करताना दिसले.