नवी दिल्ली - पटनाचा अभियंता असलेल्या तरुणीने १०० रुपयांच्या परताव्यासाठी चक्क ७७ हजार गमावले आहेत. बेंगळुरूमधील एकाने पिझ्झा मागवून ९५ हजार गमावले तर हैदराबाद येथील टेक प्रोफेशनलने खास चिकन बिर्याणीसाठी ५० हजार रुपयांनी खिसा खाली केला आहे. या तिन्ही वेगवेगळ्या प्रकरणात शुल्लक रक्कमेसाठी सायबर चोरट्यांनी हजारोंचा गंडा घातला आहे. झोमॅटोसारख्या अॅपवरून यांनी हे अन्न मागवले होते. मात्र, काही कारणाने त्या तिघांची तक्रार असल्याने त्यांनी झोमॅटो कस्टमर केअरला कॉल केला आणि गमावून बसले हजारो रुपये. त्यामुळे तुम्ही जर ऑनलाईन काहीही वस्तू मागवत असाल तर सायबर चोरट्यांपासून सावध रहा.
सायबर चोरट्यांचा एक बनावट ग्राहक सेवा क्रमांक (कस्टमर केअर नंबर) आहे. सप्टेंबर २०१९ ते फेब्रुवारी २०२० दरम्यान या सायबर चोरट्यांच्या तावडीत सापडलेल्या तिघांसोबत घडलेली घटना सारखीच आहे. या तिघांनी झोमॅटोवरून ऑनलाइन जेवणाची ऑर्डर दिली. एकाचे जेवण त्या पत्त्यावर पोहोचले नाही, दुसऱ्याचे जेवण घरपोच मिळाले तेव्हा लक्षात आले की त्यात आणखी काही वस्तू आल्या नाहीत तर तिसऱ्याला जेवण मिळाले पण त्याला ते आवडले नाही. म्हणून तिघेही नाराज झाले होते. रागाच्या भरात त्यांनी इंटरनेटवरून झोमॅटोचा कस्टमर केअर क्रमांक शोधला आणि फोन केला. हीच घोड चूक त्या तिघांनी केली आणि बनावट कस्टमर केअर क्रमांकाशी आपलया बँक खात्याची सर्व माहिती देऊन हजारो रुपये गमावून बसले. झोमॅटोचा कस्टमर केअर क्रमांक नसून ते फक्त चॅट किंवा ईमेल वर उपलब्ध आहे, असे झोमॅटो कंपनीकडून स्पष्ट सांगण्यात आले. म्हणजेच फोनवर या तिघांचे बोलणे झाले ते सर्वच फसवे फोन होते. त्यांनी झोमॅटो कस्टमर केअर एक्झिक्युटिव्ह बनून 'गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त केली' आणि पैसे परत करण्याच्या नावावर बँक खात्याची माहिती घेऊन खात्यातील पैसे साफ केले.
इंटरनेटवर आहे बनवत कस्टमर केअर क्रमांकाचा भडीमार
डेबिट कार्ड हरवले, एटीएममधून पैसे काढले नाहीत तशीही पैसे खात्यातून वजा झाले, आयआरसीटीसीवर तिकिटे बुक करताना तिकिटे बुक झाले नाही मात्र पैसे गेले, मोबाइल बँकिंगमधून पैसे पाठवायचे आहेत परंतु त्रुटी येत आहे, अशा सर्व अडचणीच्या वेळी आपण ताबडतोब कस्टमर केअर क्रमांक शोधतो. आणि आपल्यातील काही बनावट हेल्पलाइन नंबरमध्ये सापडतात आणि खिसा कापतात. त्यामुळे सर्वसामान्यांनी अशा फसवणूकीपासून सावध राहावे. म्हणजेच स्वतःच्या कष्टाने कमावलेल्या पैशांवर सायबर डल्ला मारण्यास आळा बसेल.