हैदराबादच्या एका कंपनीनं आठ बँकांना तब्बल ४ हजार ८०० कोटी रूपयांपेक्षा अधिक रकमेचा गंडा घातल्याची माहिती समोर आली आहे. सीबीआयने बुधवारी हैदराबादची इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी आयवीआरसीएल आणि त्याचे व्यवस्थापकीय संचालक ई.सुधीर रेड्डी यांच्याव्यतिरिक्त सहाय्यक व्यवस्थापकीय संचालक आर. बालारामी रेड्डी यांच्याविरोधात ४ हजार ८०० कोटी रूपयांपेक्षा अधिक रकमेची फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या तपास यंत्रणांकडून कंपनी आणि आरोपींच्या ठिकाणांवर तपास करण्यात येत आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती सीबीआयचे प्रवक्ते आर.सी.जोशी यांनी दिली. "आरोपींनी अज्ञात लोक सेवक आणि अन्य व्यक्तींसोबत मिळून सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची फसवणूक करण्यात आली. यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, आयडीबीआय, कॅनरा बँक, आंध्रा बँक, कॉर्पोरेशन बँक, एक्झिम बँक, पंजाब अँड सिंध बँक, युनियन बँक ऑफ इंडिया या बँकांचा समावेश आहे. यामध्ये बँकांची एकूण ४ हजार ८३७ कोटी रूपयांची फसवणूक करण्यात आली," अशी माहिती जोशी यांनी दिली. कंपनीनं बँकांकडून घेतलेल्या कर्जाचे हप्ते न फेडून बँकांची फसवणूक केल्याचा आरोप सीबीआयनं ठेवला आहे. याव्यतिरिक्त कंपनीवर अन्य आर्थिक गैरव्यवहारांसंबंधीही आरोप ठेवण्यात आल्याची माहिती जोशी यांनी दिली. हैदराबादमधील आरोपींची कार्यालयं आणि अन्य ठिकाणीही सध्या तपास सुरू आहे. या तपासादरम्यान अनेक महत्त्वाचे दस्तऐवज मिळाले असल्याचंही त्यांनी नमूद केलं.
हैदराबादच्या कंपनीचा सरकारी बँकांना ४,८०० कोटींचा गंडा; CBI ने दाखल केला गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2020 10:17 AM
हैदराबादच्या एका कंपनीकडून आठ सरकारी बँकांना ४ हजार ८०० कोटींचा गंडा.
ठळक मुद्देआठ सरकारी कंपन्यांना ४,८०० कोटींचा गंडाकंपनीचे व्यवस्तापकीय संचालक आणि सहाय्यक व्यवस्तापकीय संचालकांविरोधात गुन्हा दाखल