अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांचे प्रकरण: ईडी करणार बारमालकांची चौकशी; पाच जणांना समन्स
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2021 10:57 AM2021-05-26T10:57:48+5:302021-05-26T10:58:19+5:30
महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील कथित १०० कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणात ईडी बारमालकांची चौकशी करणार आहे. ईडीने मुंबईतील पाच बारमालकांना समन्स बजावून त्यांना चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे.
मुंबई : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील कथित १०० कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणात ईडी बारमालकांची चौकशी करणार आहे. ईडीने मुंबईतील पाच बारमालकांना समन्स बजावून त्यांना चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. यात, देशमुख यांनी सचिन वाझे आणि आणखी दोन पोलीस अधिकाऱ्यांना बारमालक आणि इतरांकडून १०० कोटी रुपयांची वसुली करण्यास सांगिल्याचे नमूद केले होते. तर दुसरीकडे कारवाई होऊ नये म्हणून बारमालक दर महिन्याला अडीच लाख रुपये देत होते, असा आरोप पोलीस दलातून हकालपट्टी केलेला साहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझेने केला होता. सेवेत असताना सचिन वाझे तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना रिपोर्ट करत होता.
मार्चमध्ये सचिन वाझेला अटक केली होती. यानंतर ईडीने यात उडी घेत दोन आठवड्यांपूर्वी अनिल देशमुख यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. गेल्या आठवड्यात ईडीने अॅड. जयश्री पाटील यांचा जबाब नोंदवला होता. जयश्री पाटील यांनीही अनिल देशमुख यांच्याविरोधात याचिका दाखल केली आहे. यावरून उच्च न्यायालयाने यात सीबीआय चौकशी करण्याचे निर्देश दिले होते. तर याच प्रकरणाच्या अधिक चौकशीसाठी ईडीने पाच बारमालकांना समन्स बजावून याबाबत चौकशीसाठी बोलावले आहे.