मुंबई :
वॉटर प्युरिफायरमधून कुरिअरने ऑस्ट्रेलियाला पाठवण्यात येत असलेले चरस नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) युनिटने ताब्यात घेतले. कन्साइनर आणि कुरिअर एजंटच्या मुसक्याही आवळण्यात आल्या आहेत. रविवारी ही कारवाई करण्यात आली असून त्याची किंमत अद्याप उघड करण्यात आलेली नाही.
वॉटर प्युरिफायरच्या आत बनवलेल्या विशेष पोकळीत लपवून ठेवलेले ४ किलो ८८ ग्रॅम किलो चरस हस्तगत करण्यात एनसीबीला यश मिळाले. आम्ही याप्रकरणी दोघांना अटक केली आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी रविवारी दिली. जप्त केलेल्या या साठ्याची नेमकी किंमत किती याचा तपास सुरू असून, त्यामुळे एनसीबीने ती अद्याप उघड केलेली नाही. एका गुप्त माहितीच्या आधारे तपास करत ही कारवाई करण्यात आली. एनसीबी अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, अमली पदार्थ ऑस्ट्रेलियाला पाठवल्या जाणाऱ्या वॉटर प्युरिफायरमध्ये बनवलेल्या पोकळीत लपवण्यात आले होते. दोघांच्या प्राथमिक चौकशीत कुरिअर फ्रँचायझीचा मालकही अमली पदार्थांच्या तस्करीत सामील असल्याचे निष्पन्न झाले आहे, असे पाेलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.
अमली पदार्थांची ऑस्ट्रेलियात तस्करीकुरिअर एजंट कन्साइनरच्या ओळखीची पडताळणी न करता पार्सल पाठवत होता. ‘मुख्य रिसीव्हर’च्या सूचनेनुसार त्याने अनेक वेळा असे अनेक पार्सल पाठवल्याची कबुली दिल्याचे अधिकाऱ्याचे म्हणणे आहे. पार्सल पाठवण्यासाठी कन्साइनरने बनावट ओळखीचा वापर केला होता. या नेटवर्कने यापूर्वी अशा प्रकारचे अनेक पार्सल पाठवले आहेत. आरोपींवर एनसीबीने गुन्हा दाखल केला असून फरार आरोपींचा शोध घेत तपास सुरू केला आहे.