माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी सचिन वाझेला १०० कोटींची खंडणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गोळा सांगितल्याचा आरोप केला होता याप्रकरणी अखेर राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची समन्स बजावून सीबीआय चौकशी आज पार पडली आहे. सीबीआयने तब्बल साडे आठ तास त्यांची चौकशी केली. यावेळी सीबीआयने त्यांना अनेक उलटसुलट प्रश्न विचारल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, अनिल देशमुखांनी याबाबत मौन बाळगल्याने नेमकं चौकशीत काय प्रश्न विचारले हे गूढ कायम आहे.
दोन दिवसांपूर्वी सीबीआयने समन्स बजावल्यानंतर अनिल देशमुख आज सकाळी १० वाजता सीबीआयच्या कार्यालयात दाखल झाले होते. यावेळी सीबीआयचे एसपी दर्जाचे अधिकारी अभिषेक दुलार आणि किरण एस. यांच्याकडून देशमुखांची चौकशी करण्यात आली. सांताक्रुझच्या कालिना येथील डीआरडीओच्या कार्यालयात ही चौकशी करण्यात आली. तब्बल साडे आठ तास देशमुखांची झाडाझडती घेण्यात आली. चौकशीसाठी सीबीआयने प्रश्नांची यादी तयार केली होती. त्यापूर्वी सीबीआयने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची चौकशी केली होती. त्यांच्याकडून मिळालेल्या उत्तरे, सिंग यांचं पत्रं आणि कोर्टात दाखल करण्यात आलेल्या याचिकेतील आरोपांच्या आधारे सीबीआयने ही प्रश्नावली तयार केली होती अशी माहिती सूत्रांनी दिली. त्यावरून देशमुख यांना प्रश्न विचारण्यात आले. सीबीआयने अत्यंत कसून ही चौकशी केली.